आता मध्‍य प्रदेशातही बिहारींना विरोध

वेबदुनिया

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2009 (17:03 IST)
PTI
महाराष्‍ट्र आणि मुंबईत उत्तर प्रदेश व बिहारींच्‍या वाढत्या लोंढ्यांच्‍या विरोधात आंदोलन केल्‍याबद्दल आणि भूमीपुत्रांना नोक-या देण्‍याची मागणी केल्‍याबद्दल तमाम हिंदी भाषिक माध्‍यमांचा रोष ओढवून घेतलेल्‍या मनसे नेते राज ठाकरे यांच्‍याच पावलावर पाऊल ठेवून आता मध्‍यप्रदेशचे मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही बिहारी आणि उत्तर प्रदेशच्‍या लोकांना राज्‍यात नोक-या करू देणार नसल्‍याचे जाहीर केले आहे.

सतना येथे एका कार्यक्रमात मुख्‍यमंत्री शिवराज सिंह‍ चौहान यांनी स्‍थानिकत्वाचा मुद्दा उचलून धरत यापुढे राज्यात भूमिपुत्रांनाच नोक-यांमध्‍ये प्राधान्‍य दिले जाणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. आपल्‍या राज्यात बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांना आपण नोक-या करू देणार नसल्‍याचेही त्‍यांनी उघडपणे जाहीर केल्‍याने मध्‍यप्रदेशातही स्‍थानिकत्‍वाच्‍या मुद्यावरून आंदोलन पेटण्‍याची चिन्‍हे निर्माण झाली आहे.

सतना आणि इंदूर सारख्‍या शहरांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर बिहारी कारागिर असून मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यांना राज्य सोडून जावे असे बजावले आहे.

वेबदुनिया वर वाचा