अमित शाहांच्या टीमवर दिसेल संघाची छाप?

मंगळवार, 29 जुलै 2014 (17:19 IST)
नवी दिल्ली- भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) छाप दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संघातील जास्तीत‍ जास्त सदस्यांना प्रतिनिधित्त्व मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी आपल्या टीममध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संघ परिवारातल प्रभारी आणि भाजपचे समन्वयक सुरेश सोनी यांचा पायउतार होण्याचेही संकेत अमित शाह यांनी दिले आहे. सुरेश सोनी यांच्या जागी संघाचे महासचिव कृष्ण गोपाल यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांच्या टीममध्ये संघ नेता शिव प्रकाश, व्ही.सतीश आणि सौदान सिंह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

उपाध्यक्षपदासाठी मुरलीधर राव यांचे तर व्ही सतीश यांचे संयुक्त सचिवपदासाठी नाव चर्चेत आहे. संघ आणि भाजपमध्ये उत्तम समन्वय राखला जाण्यासाठी राम माधव यांना टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. शाह यांचा टीममध्ये संघाचे चार सदस्य असतील. उल्लेखनिय म्हणजे शाह यांच्या टीममध्ये 33 टक्के महिला पदाधिकारी असतील. नवी टीममध्ये राम माधव, वरूण गांधी आणि राजीव प्रताप रूडी यांचा समावेश केला जाणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांना भाजपच्या यूथ विंगचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या नव्या संसदीय मंडळाची घोषणा 17 ऑगस्टला होऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा