अखेर संत रामपाल याला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

गुरूवार, 20 नोव्हेंबर 2014 (11:43 IST)
तीन दिवसांच्या संघर्षानंतर पोलिसांनी संत रामपाल याला अटक केले. हरियाणातील हिस्सार येथील सतलोक आश्रमातून पोलिसांनी रामपाल याला ताब्यात घेतले. 
 
रामपाल याला पोलिसांनी अॅम्ब्युलन्समधून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तसेच आश्रमातून अनेक लोकांची सूटका करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सतलोक आश्रमाला पोलिसांनी सिल केले असून मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 
  
हिस्सारमध्ये रामपालच्या सतलोक आश्रमात नरबळी गेल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने रामपाल याला अटकेचे आदेश दिले होते. मात्र रामपालला आश्रमात घुसून अटक करायला समर्थकांनी पहिल्यांदा जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलिस आणि समर्थकांमध्येही धुमश्चक्री झाली. यामध्ये आतापर्यंत सहा निष्पापांचा बळी गेला आहे.
 
दरम्यान, बुधवारी सकाळपासून रामपालच्या आश्रमाभोवतीचा पोलिसांनी अधिकाधिक बंदोबस्ताला सुरूवात केली होती. आश्रमातील जवळपास सर्व समर्थकांना बाहेर काढत आश्रम मोकळा केला होता.
 
मंगळवारी रामपाल समर्थक आणि पोलिसात झालेल्या धुमश्चक्रीत पाच महिला आणि एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाल्याची माहिती समोर आली. बुधवारीदेखील रामपाल समर्थकांकडून पोलिसांना विरोध, दगडफेक, गोळीबाराचे प्रकरण सुरूच राहिले. त्यामुळे पोलिसांनीही आक्रमक होत कारवाई सुरू ठेवली असून आश्रमाची भिंत पाडून आत प्रवेश केला आहे व आश्रम रिकामी करण्याचा आदेश समर्थकांना देण्यात आला आहे.
 
दरम्यान, 1951 मध्ये सोनपत येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रामपाल हरियाणा सरकारच्या पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता होता. सेवेत कामचुकारपणा केल्याने रामपाल याला निलंबित केले होते. 
 
शासकीय सेवेत असतानाच 1999 मध्ये त्याने आपला पहिला आश्रम काढला. नंतर आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरियाणात अनेक भागांत आश्रम काढले. आर्य समाजविरोधात झालेल्या संघर्षांत एकाची हत्या झाली. तेव्हापासून न्यायालयीन लढाईत रामपाल आला. या हत्येवरून त्याला नंतर जामीन मिळाला पण नंतरच्या 42 सुनावणींतील गैरहजेरीमुळे कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले. रामपालवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा