दोन रेल्वे घसरल्या; २४ प्रवाशांचा मृत्यू भोपाळ

बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (10:01 IST)
मुंबई - वाराणसी कामयानी एक्सप्रेस व जनता एक्सप्रेस या दोन गाड्यांचे १६ डबे रुळावरुन घसरल्याने २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईहून वाराणसीला जाणारी कामयानी एक्सप्रेस रात्री साडे अकरा वाजता मध्यप्रदेशमधील खिरकिया या स्थानकावरुन रवाना झाली. २० मिनीटांनी या गाडीने हरदा येथे पोहोचणे अपेक्षीत होते. मात्र या दोन स्थानकादरम्यान माचक नदी असून या नदीवरील पुलावरुन जात असताना कामयानी एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन घसरले.  याच पुलावर बिहारमधील राजेंद्रनगरहून मुंबईकडे येणारी जनता एक्सप्रेसही आली व या गाडीचेही पाच डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे माचक नदीचे पाणी पुलावर आले होते व यामुळे रुळाखालील खडी वाहून गेली होती.

यामुळेच डबे घसरुन हा विचित्र अपघात घडला असा अशी शक्यता वर्तवली जात आहे. सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातानंतर मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय, रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाकडून अपघाताची चौकशी करण्यात येईळ, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा