महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजवर अजामीणपात्र गुन्ह्याखाली आरोप दाखल करण्यात आल्यानंतर गृहमंत्रालयाने अटकेस हिरवा कंदील दाखवला आहे.
केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींशी यासंबंधात भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान शहरातील सौहार्द बिघडवल्याप्रकरणी राजवर गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी राजच्या घराबाहेर कडक सुरक्षा तैनात केली आहे.
संभावित अटकेच्या पार्श्वभूमीवर 'मनसे'चे कार्यकर्ते मंगळवारपासून पुणे, नाशिक, औरंगाबादसह महाराष्ट्रभर निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहे. मुंबई पोलिसांनी राजविरूद्ध शहरात हिंसा भडकवण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या 153 अ, 153 ब, व कलम 117 अंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याने अटक अटळ मानण्यात येत आहे.