राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राबल्य असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या अटकेचे तीव्र पडसाद उमटले असून अटकेचे वृत्त कळताच काही मिनिटांमध्ये नाशिकमध्ये हिंसाचारास सुरूवात झाली आहे.
अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून नाशिकमधील क. का. वाघ महाविद्यालयासमोर झालेल्या दगडफेकीमध्ये एच. एल. मध्ये काम करणारे अंबादास धारराव यांना आपला प्राण गमवावा लागला. राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा पहिला बळी देखील मराठी माणूसच ठरला आहे.
नाशिकमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक झाल्याने अघोषित कर्फ्यूची स्थिती निर्माण झाली असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. नाशिकमधील उद्रेकाचा तेथे राहणार्या उत्तर भारतीयांनी प्रचंड धसका घेतला असून नाशिकबाहेर जाणार्या रेल्वे आणि बसेस भरभरून वाहत आहेत.