'इंडिया' आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत जागावाटपाचं सूत्र ठरणार की समन्वयक?

गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (13:17 IST)
मयुरेश कोण्णूर
31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दोन्ही दिवशी मुंबईमध्ये 'इंडिया' या विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीची दोन दिवसीय बैठक होते आहे. पहिली पटना, दुसरी बेंगळुरुनंतर आता मुंबईत होणारी ही तिसरी बैठक जागावाटपाच्या निर्णायक टप्प्यावर या आघाडीला घेऊन जाईल अशी शक्यता आहे.
 
पटन्यात विरोधकांच्या तोपर्यंत केवळ कल्पनाच वाटणाऱ्या एकजुटीवर शिक्कामोर्तब झालं. बेंगळुरुमध्ये गाडं थोडं पुढे जाऊन या आघाडीचं 'इंडिया' असं नामकरण झालं. हे नाव निवडण्यामागच्या राजकीय चातुर्याचा परिणाम मधल्या काळात दिसला.
 
एकीकडे पंतप्रधान मोदींपासून भाजपाच्या इतर नेत्यांनी विविध विशेषणांनी त्यावर टीका केली, पण दुसरीकडे त्यामुळे 'एनडीए' विरुद्ध 'इंडिया' हे सर्वतोमुखी झालं.
 
पण असं असलं तरीही हे काही कोणत्याही आघाडीसमोरचे सर्वांत महत्वाचे मुद्दे नव्हेत. त्यांचा समान कार्यक्रम, नेतृत्व आणि मुख्य म्हणजे जागावाटप हे जास्त महत्त्वाचं. भाजपाविरोध हा समान उद्देश असला तरीही निवडणुकीला सामोरं जातांना चेहराही हवा आणि जागा ठरल्या की निवडणुकांची तयारीही करता येते.
 
पण हे संवेदनशील मुद्दे आहेत. त्यावर घडवलेला खेळ हा बिघडूही शकतो. त्यामुळे जागावाटपाचं काय हा प्रश्न 'इंडिया'च्या नेत्यांना सतत विचारला जातो आहे. त्या मुद्द्यावर मुंबईच्या बैठकीत पहिलं पाऊल उचललं जाईल. शिवाय पहिल्यांदाच या बैठकीत काही 'ठराव' संमत केले जातील ज्याचा मसूदा तयार करण्याची जबाबदारी ही कॉंग्रेसकडे आहे.
 
NDA विरुद्ध INDIA : कोणत्या आघाडीत कोणते पक्ष? लोकसभेत कोणाचे किती सदस्य? वाचा संपूर्ण यादी
पटन्यात यजमानपद नितीश कुमारांकडे होतं, तर बेंगलुरूमध्ये कॉंग्रेसकडे. पण पहिल्यांदाच महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी' म्हणून शिवसेना, कॉंग्रेस आणि शरद पवारांसोबत असणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितरित्या 'इंडिया' बैठकीचे यजमान आहेत.
 
त्यामुळे या बैठकीतून हेही समजेल की महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी'ची स्थिती, विशेषत: अजित पवारांच्या बंडानंतर, कशी आहे. 2 जुलैला, बेंगळुरुच्या बैठकीच्या तोंडावर, अजित पवारांसह राष्ट्रवादीचा एक गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला होता.
 
राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, एम के स्टॅलिन, ममता बॅनर्जी असे अनेक पक्षप्रमुख, मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे 60 नेते मुंबईत येत आहेत.
 
'जागावाटप' कसं करणार?
जागावाटपाचं सूत्र कसं ठरवायचं हा या आघाडीसमोरचा सर्वांत महत्वाचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक राज्यातली परिस्थिती वेगवेगळी आहे.
 
जरी सध्या ज्या पक्षाचा विद्यमान खासदार आहे तिथे तोच पक्ष निवडणूक लढवणार असं जरी ठरलं, तरी त्यानं मोजक्या जागांचाच प्रश्न सुटतो, सगळ्या नाही. शिवाय, या आघाडीतल्या अनेक पक्षांनी गेल्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध अनेक जागा लढवल्या आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, 'इंडिया'च्या पहिल्या दोन बैठकांमध्ये जागावाटपावर मोघम चर्चा झाली आहे. पण धोरण अद्याप ठरलं नाही. प्रत्येक राज्यात राजकीय स्थिती निराळी असल्यानं देशभरासाठीच एकच धोरण ठरवता येणार नाही हे स्पष्ट आहे.
 
त्यामुळे मुंबईच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरु होईल आणि पहिलं पाऊल म्हणून राज्यनिहाय समित्या तयार केल्या जातील, असं एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं.
 
या राज्यनिहाय समित्या आपापल्या राज्यात जागावाटपाचं सूत्र ठरवून त्या केंद्रीय समितीला कळवतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. उदाहरणार्थ महाराष्ट्रात हा निर्णय महाविकास आघाडी घेईल.
 
जिथे कॉंग्रेस एकटी भाजपा विरोधात आहे तिथे प्रश्न नाही, पण पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश इथे इतर प्रादेशिक पक्षांसोबत जागा विभागून घेतांना राजकीय समजूतदारपणाची परिक्षा लागणार आहे.
 
बंगालमध्ये ममतांना अगोदरच आक्रमक पावित्रा घेतला आहे. दिल्लीच्या 7 जागा कोणी लढवायच्या यावरुन कॉंग्रेस आणि 'आप'मध्ये समाजमाध्यमांमध्ये घमासान सुरु झालं आहे. अर्थात हे संघर्ष होणं अपेक्षितच आहे. आता या बैठकीत काय निर्णय होतो त्याकडे लक्ष आहे.
 
अध्यक्ष की समन्वयक? कोणाच्या गळ्यात माळा?
'इंडिया' आघाडीचं नेतृत्व कोणाकडे? हा एक कळीचा मुद्दा आहे. एकीकडे नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करुन तिसरी निवडणूक लढणाऱ्या भाजपाचं आव्हान स्वीकारायचं असेल तर विरोधकांनी पण एक चेहरा दिला पाहिजे का?
 
जरी राहुल गांधी 'भारत जोडो यात्रे'नंतर देशभर चर्चेचं केंद्र बनले असले तरीही आघाडीची एकजूट म्हणून त्यांचा चेहरा अगोदरच पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट होणार नाही. कॉंग्रेसनं अगोदरच ही लढाई मोदी विरुद्ध इंडिया अशी असेल हे म्हटलं आहे.
 
पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याचा प्रश्न जेव्हा बैठकीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत वारंवार विचारला गेला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, "तुम्ही आमच्या प्रतिस्पर्धी पक्षाला का विचारत नाही की त्यांच्याकडे पर्याय काय आहे? गेली नऊ वर्ष एकच चेहरा आहे. आमच्याकडे मात्र अनेक पर्याय उपलब्ध आहेत."
 
पण तरीही यूपीए वा एनडीएसारखं एक अध्यक्षपद अथवा समन्वयपद असावं असं ठरलं आहे. या पदावर कोण हाही संवेदनशील मुद्दा आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांची त्यासाठी इच्छा आहे.
 
नितीश कुमार त्यासाठी आग्रही होते असं म्हटलं गेलं आणि बेंगळुरुच्या बैठकीतही ते त्यांना न दिलं गेल्यानं ते नाराज झाले अशा बातम्या आल्या. पण आता स्वत: नितीश यांनी त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचं म्हटलं आहे.
 
त्याशिवाय शरद पवार, ममता बॅनर्जी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नांवही चर्चेत पहिल्यापासून आहेत. पण आता सध्या कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सगळ्यांत आघाडीवर आहे. ते ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत आणि सुरुवातील नितीश कुमारांच्या मदतीनं त्यांनीच इतरांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले होते. शिवाय कॉंग्रेस हा आघाडीत सर्वांत मोठा पक्ष आहे.
 
पण अध्यक्ष अथवा समन्वयक पदासोबत सहा ते अकरा जणांची सचिव म्हणूनही एक समिती असेल. त्यात सगळ्या पक्षांना समावून घेतलं जाईल असं सांगितलं जातं आहे. ही समिती सगळे निर्णय अंतिम करेल.
 
अर्थात, अध्यक्षपद अथवा समन्वयकपद हे या आघाडीतला एक संवेदनशील मुद्दा असल्यानं जर त्यावरुन या बैठकीमध्ये वाद सुरु झाले, नाराजी वाढत चालली तर त्याला तात्पुरती बगलही देण्यात येईल. मग सगळ्या पक्षांचा सहभाग असलेली एकच समिती करण्यात येईल.
 
'इंडिया'चा नवीन लोगो
या आघाडीची एकजूट दाखवण्यासाठी मुंबईच्या बैठकीमध्ये एका 'लोगो' म्हणजेच 'प्रतिक चिन्हा'चं प्रकाशनही करण्यात येणार आहे.
 
सर्व पक्षांना आणि नेत्यांना संमत होईल असं डिझाईन तयार करण्यात येऊन हा 'लोगो' प्रकाशित करण्यात येईल.
 
त्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या वा सहभागी पक्षांच्या स्वत:च्या कार्यक्रमांमध्ये हाच लोगो प्रामुख्यानं वापरण्यात येईल.
 
'इंडिया' हे नाव ठरवतांनाही बेंगळुरुमध्ये चर्चा झाली होती. ते कोणी सुचवलं यावरुन नंतर थोडा वादही झाला होता.
 
पण आता 'लोगो'च्या बाबतीत सर्वसहमतीची खबरदारी घेतली जात आहे. त्यात भारताचा तिरंगा असेलच, पण त्याव्यतिरिक्त सगळ्यांची एकजूट, सगळ्या वर्गांना सामावणारी अन्य कोणती प्रतीकं या लोगोमध्ये असतील याविषयी उत्सुकता आहे.
 
याशिवाय नवीन लोगोसोबतच 'इंडिया' आघाडीचे एकत्र कार्यक्रम, सभा येत्या काही काळात सुरु करण्यावरही चर्चा होणार आहे.
 
देशभरात सगळे नेते एकत्र येऊन विविध शहरांमध्ये 'इंडिया'च्या सभा होणार आहेत. या सभांच्या कार्यक्रमाविषयी काही निर्णय बैठकीत घेण्यात येईल. महाराष्ट्रात ही सभा नागपूरला होण्याची शक्यता आहे.
 
'इंडिया' आघाडीचा किमान समान कार्यक्रम, त्यांचं मध्यवर्ती कार्यालय, आघाडीचे प्रवक्ते हेही मुद्दे मुंबईच्या बैठकीत चर्चेला असतील. यावर निर्णय झाले किंवा नाही याबाबतीत 1 तारखेला बैठक झाल्यावर सगळे नेते एकत्र पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील.
 
'इंडिया'मध्ये नवे मित्र सहभागी होणार का?
या आघाडीमध्ये अजून नवे पक्ष, जे भाजपाविरोधी आहेत, ते सहभागी होण्यासाठी प्रयत्न गेले काही दिवस सुरु होते. पण मुंबईच्या बैठकीपर्यंत त्यातले किती नेमके सामील होतील याबद्दल साशंकता आहे.
 
महाराष्ट्रातल्या 'शेकाप', राजू शेट्टींची 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' यांसारख्या काही पक्ष संघटनांनी एकत्र चर्चा केली आहे. ते या बैठकीदरम्यान 'इंडिया'त सहभागी होतात का ते पाहावं लागेल.
 
मुंबईच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित बहुजन आघाडी'च्या समावेशाची मोठी चर्चा सुरु होती. पण ते या दोन दिवसांमध्ये प्रत्यक्षात येईल असं दिसत नाही.
 
आंबेडकर यांची उद्धव ठाकरेंसोबत अनेकदा चर्चा झाली आहे. पण ते शिवसेना आणि वंचित यांच्या मुंबईतल्या निवडणुकांबाबत बोलले असून अद्याप 'इंडिया' विषयी निर्णय झालेला नाही.
 
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी 'बसपा'च्या प्रमुख मायावती यांच्याशी चर्चा केली अशी बातमी आहे. मायावतींनी अद्याप 'इंडिया'मध्ये सहभागी होण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत.
 
उत्तर प्रदेश एकूणच देशाच्या सत्तेसाठी सगळ्यांत महत्त्वाचं राज्य आहे. अखिलेश यादव आणि त्यांची समाजवादी पार्टी 'इंडिया'चा भाग आहेत. पण मायावती सोबत आल्या तर सपा, बसपा आणि कॉंग्रेस मिळून भाजपाला आव्हान निर्माण करु शकतात असं गणित आहे.
 
शरद पवारांकडे लक्ष
'इंडिया'च्या या बैठकीत सगळ्यांचं लक्ष विशेषत्वानं शरद पवारांकडे असेल. त्यांच्या पक्षातली फूट आता कायम झाली आहे. अजित पवारांचं भाजपासोबत जाणं गेल्या बैठकीच्या तोंडावर घडलं होतं. पण आता महिन्याभरात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत.
 
शरद पवारांनी त्यांची भूमिका ही भाजपाविरोधी आहे हे गेल्या महिन्याभरात अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यांच्या सभाही झाल्या आहेत. पण तरीही मित्रपक्ष आणि एकंदरीतच राज्याच्या राजकारणात त्यांच्या पुढच्या रणनीतिविषयी शंका आहेत, हेही वास्तव आहे.
 
शरद पवार या बैठकी अगोदर बुधवारी (30 ऑगस्ट) झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, "एकूण 28 पक्षांचे 63 नेते या बैठकीत सहभागी होत आहेत. देशात परिवर्तन आणण्यासाठी हे सगळे एकत्र आले आहेत आणि आम्ही ते घडवून दाखवू."
 
पण ज्या वेळेस पवारांना त्यांच्या भूमिकेबद्दल असलेल्या संभ्रमाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "कोणताही संभ्रम नाही. भूमिका स्पष्ट आहे. आणि आमच्यातल्या ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना येत्या निवडणुकीत लोक धडा शिकवतील."
 
त्या संभ्रमाबद्दल शिवसेना, कॉंग्रेस हेही बोलले आहेत. त्यामुळे मुंबईच्या बैठकीत शरद पवार आपल्या 'इंडिया'मधल्या मित्रांना कसा विश्वास देतात आणि या आघाडीच्या भविष्याबद्दल कशी निर्णायक भूमिका निभावतात, याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील.
 
जवळपास 60 नेते मुंबईत एकत्र येत आहेत. कॉंग्रेसनं याची तुलना 1942 च्या मुंबई अधिवेशनातून दिलेल्या 'चले जाव'च्या ठरावाशी केली आहे. तसे ऐतिहासिक निर्णय काही होतात का हे बैठकीनंतरच समजेल, पण भाजपाचंही या बैठकीकडे गांभीर्यानं लक्ष असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती