कोण आहे एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे...

बुधवार, 10 मार्च 2021 (16:04 IST)
सचिन वाझे 1990 बॅचचे पोलिस अधिकारी असून एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. 
 
सचिन हिंदूराव वाझे मुळचे कोल्हापूरचे असून यांची 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. अवघ्या दोन वर्षात 1992 मध्ये त्यांची बदली ठाण्यात झाली. वाझे यांची मुंबईत क्राइम ब्रांचमध्ये पोस्टिंग झाल्यावर एन्काउंटची कहाणी सुरु झाली. मुन्ना नेपालीच्या एन्काउंटरमुळे ते मुंबई पोलीस दलात चर्चेत आले. मुंबईतील एक आणखी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे सचिन वाझेंचे मेंटॉर असल्याचे सांगितले जाते.
 
मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. 
 
2002 च्या घाटकोपर बस बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी यांची भूमिका असल्यामुळे त्यांना 2004 साली निलंबित करण्यात आले होते. यूनुसला औरंगाबाद नेत असताना तो फरार झाला होता परंतू सीआयडी चौकशीत पोलिस कोठडीत त्याच्या मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
 
शिवसेनेत झाले होते सामील
नंतर 2008 मध्ये सचिन वाझे शिवसेनेत सामील झाले होते. वाझे यांनी 1997 मध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रेडीटकार्ड रॅकेट उघडकीस आणलं होतं. सचिन वाझे यांची तकनीकी बाजू चांगली असल्यामुळे 2010 साली त्यांनी लाल बिहारी नावाची नेटवर्किंग साइट देखील सुरु केली होती. सचिन वाझे यांनी आपल्या करिअरची सुरुवात पुणे येथून केली होती. सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते तसेच शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली.
 
अर्णब गोस्वामी प्रकरणी चर्चेत आले
अन्वय नाईक आत्महत्या प्रकऱणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सचिन वाझे यांच्या पथकाने त्यांच्या घरातून उचललं होतं.

उल्लेखनीय आहे की मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन विरोधकांच्या निशाण्यावर असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती