नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी आणि पुनमिया दोन कुटुंबियांचा मृत्यू

सोमवार, 30 मे 2022 (15:42 IST)
नेपाळमधील तारा एअरलाईन्सचे दुर्घटनाग्रस्त विमान शोधण्यात नेपाळच्या लष्कराला यश आले . रविवारी सकाळी हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विमानात 4 भारतीयांसह एकूण 22 प्रवाशी होते. शोध मोहिमेदरम्यान, मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथे या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह ताब्यात घेण्याचे काम लष्कराकडून सुरू आहे.

नेपाळ सैन्याच्या शोध आणि बचाव दलाने विमान अपघात स्थळाचा प्रत्यक्ष शोध घेतला असून, विमानातील सर्वच प्रवासी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या 22 पैकी 14 लोकांचे शव ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून, काही मृतदेहांची ओळख अद्याप पटली नाही. बचाव दलाकडून सध्या तपास सुरु आहे. दरम्यान, या विमान अपघातात आणि सिक्कीममधील मोटार अपघातात ठाण्यातील त्रिपाठी आणि पूनमिया कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, नेपाळमधील विमान तसेच सिक्कीम मोटार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी व पूनमिया या दोन वेगवेगळय़ा कुटुंबांतील सर्व सदस्य त्यात लहान बालकांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे.पर्यटकांसाठी असलेल्या सुरक्षिततेची पूर्तता अत्यावश्यकच आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती