Mumbai boat accident : मुंबईच्या किनारपट्टीवर नौदलाच्या जहाजाने एका पर्यटक बोटीला धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर, गुरुवारी अधिकाऱ्यांनी गेटवे ऑफ इंडियावरून बोटीतून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना लाईफ जॅकेट अनिवार्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारच्या दुर्घटनेतून वाचलेल्या काहींनी बोटीवर पुरेशी लाईफ जॅकेट नसल्याचा दावा केला. बुधवारी दुपारी नौदलाचे जहाज इंजिन चाचणीदरम्यान 'नील कमल' या प्रवासी फेरीला धडकले, त्यामुळे नौदलाचे कर्मचारी आणि दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांसह 13 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 101 जणांना वाचवण्यात यश आले. गेटवे ऑफ इंडियावर तैनात असलेले सहायक बोट निरीक्षक देविदास जाधव यांनी सांगितले की त्यांनी प्रत्येक प्रवाशासाठी लाईफ जॅकेट वापरणे अनिवार्य केले आहे.
नौदलाने सांगितले की, बुधवारी दुपारी मुंबई किनाऱ्याजवळ इंजिन चाचणी सुरू असताना नौदलाच्या एका जहाजाचे नियंत्रण सुटले आणि ते 'नीलकमल' नावाच्या बोटीला धडकले. या अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. तर 101 जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही बोट गेटवे ऑफ इंडिया येथून प्रवाश्यांना प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'एलिफंटा' बेटावर घेऊन जात होती.