महामार्गावर बर्नींग बसचा थरार; काही मिनिटांत बस जळून खाक ;या बसमधून 52 प्रवासी प्रवास करीत होते

शुक्रवार, 13 मे 2022 (20:55 IST)
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत एसटी महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला. आज मुंबई सेंट्रल येथून महाड येथील फौजी आंबवडे येथे जाणाऱ्या एमएच 14 बीटी 2056 क्रमांकाच्या एसटी बसला सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने बसमधील प्रवाश्यांची एकच तारांबळ उडाली. परंतु प्रसंगावधानामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
या बसमधून 52 प्रवासी प्रवास करीत होते. बसच्या समोरील बाजूकडून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्कळ बस थांबवून प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले. आग इतकी भीषण होती की, या आगीत काही वेळेतच एसटी बस जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवाश्यांसह कंडक्टरचे सर्व सामान जाळून खाक झालेय.
 
या घटनेनंतर तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आग गंभीर स्वरूपाची असल्याने तब्बल तासाभराने अग्निशमन दलाला आग विझवण्यास यश आले. या अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती