राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दणका, FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली

सोमवार, 25 एप्रिल 2022 (21:14 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट तसेच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राणा दाम्पत्यावर देशद्रोहासह अन्य कलामांन्वये गुन्हे दाखल आहेत. राणा दाम्पत्याला रविवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याने आज मुंबई हायकोर्टात (mumbai high court) एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
 
नवनीत राणा (navneet rana)आणि रवी राणा (ravi rana) यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात सादर केली होती. पोलिसांची कारवाई पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि राजद्रोहाचे कलमही त्याच उद्देशाने लावण्यात आलं आहे. त्यामुळे हे कलम रद्द करण्याचे आणि एफआयआरही रद्द करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी विनंती राणा दाम्पत्याने या याचिकेत केली होती. न्यायमुर्ती वराळे आणि मोडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमुर्तींनी राणा दाम्पत्यांची चांगलीच कानउघडणी केली. जर तुम्ही लोकप्रतिनिधी असाल तरी आपल्या विरोधकांशी आदरात्मक विरोध असावा. आम्ही याबद्दल आमचं मत एका प्रकरणात व्यक्त केलं होतं. पण हे सर्व बहिऱ्या कानावर पडत आहे हे दुर्दैव आहे, अशी तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायमूर्तींनी राणा दाम्पत्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे राणा दाम्पत्याचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती