म्हणून लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस विलंब झाला

शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (21:35 IST)
लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांमधील वादामुळे विलंब झाला. पण पोलिस, लालबागचा राजा आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चेतून तोडगा काढण्यात आल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. याठिकाणी १४४ नुसार जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. पण स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या विनंतीमुळे १०० दुकानदारांना एक मालक आणि नोकर अशा स्वरूपाने परवानगी देण्यात येणार असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. याबाबतचा सुधारीत आदेश काढण्यात येईल असेही ते म्हणाले. 
 
याठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये या उद्देशानेच मुंबई पोलिसांनी दुकान बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून दिले होते. पण या आदेशामुळे व्यापारी आणि दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली होती. परिणाम लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापनेतही विलंब झाला. अखेर विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः याठिकाणी पोहचत हा विषय सोडवला. मुखदर्शन तसेच मंडपातील दर्शन बंद असल्याने गर्दी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच एका रांगेतील ४७ दुकाने तर दुसऱ्या रांगेतील ४६ दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाला विरोध झाल्याने अखेर मंडळाचे सुधीर साळवी, दगडू सकपाळ आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या प्रकरणात तोडगा निघाला. सुधारीत आदेश हे १० दिवसांसाठी लागू असतील, असे विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सकाळी दहा आणि सायंकाळी दहा तसेच तीन तंत्रज्ञ इतक्याच व्यक्तींसाठी परवानगी देण्यात आली असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती