एटीएसला ठाणे कोर्टाचे आदेश, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास तत्काळ थांबवा

गुरूवार, 25 मार्च 2021 (07:48 IST)
एंटीलिया” बाहेर गाडीत आढळलेल्या स्फोटकांचा तपास एनआयए वेगाने करत असून, या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी असलेल्या (निलंबित) सहायक पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याविरुद्ध सबळ पुरावे सापडू लागले आहेत. तसेच, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासात देखील मुख्य संशयित सचिन वाझे असल्याने याही प्रकरणाचा तपास एनआयएने, केंद्र सरकारला विनंती करून आपल्याकडे घेतला आहे. या आधी हा तपास महाराष्ट्र एटीएस करत होती.
 
दरम्यान, दुसरीकडे केंद्राने हा तपास एनआयएला दिला असला तरी, एटीएसने आपल्या बाजूने तपास सुरूच ठेवल्याने, इथेही केंद्र आणि राज्यातला संघर्ष सुरु असलेला पाहायला मिळत आहे. यावरून एनआयएने कोर्टात विनंती याचिका दाखल केली असून, ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवा, असे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत. तपास थांबवून हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवण्यात यावीत, असेही कोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे.’
 
एनआयएने कोर्टात दाखल केलेल्या विनंती याचिकेमध्ये, ‘मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपासही केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली आहे. तरीही एटीएसने तपास सुरू ठेवला आहे आणि आरोपींची कोठडीही मिळवत आहे. तपास तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा’, अशा पद्धतीचा आशय लिहिण्यात आला आहे. त्यामुळे कोर्टाने हा आदेश दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती