मुंबईत उष्णतेची लाट कशामुळे आली? ही परिस्थिती किती दिवस राहणार?

रविवार, 28 मार्च 2021 (19:17 IST)
मुंबईची हवा गेल्या काही दिवसांपासून बरीच तापली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई आणि परिसराचं तापमान 40 डिग्री सेल्सियसच्या आसपास असल्याचं पाहायला मिळतं.
 
मार्च महिन्यातच तापमान इतकं कसं वाढलं, त्यामुळे आता एप्रिल-मे महिन्यात काय परिस्थिती ओढवणार आहे, याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
 
या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.
 
कुठे-कुठे वाढलं तापमान?
गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड तसंच कोकण किनारपट्टीच्या परिसरात तापमानात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
 
तसंच गुजरातच्या किनारी भागातही अशीच तापमान-वाढ पाहायला मिळाली. गुजरातच्या सौराष्ट्र कच्छ, पोरबंदर, गीर, सोमनाथ, तसंच दीव-दमण या परिसरात उष्ण लहर आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.
 
मुंबईत तर 27 मार्च रोजी तापमानात विक्रमी वाढ झाली. मुंबईच्या सांताक्रूज परिसरात 27 मार्च दुपारी अडीचच्या सुमारास ला 40.6 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं.
 
तापमान कशामुळे वाढलं?
मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली. सुरुवातीच्या टप्प्यातच इतकं ऊन वाढल्याने नागरिकांना त्याचं आश्चर्य वाटलं.
 
पण ही उष्णता नेहमीसारखी नव्हती. मुंबई ही आपल्या दमट हवामानासाठी ओळखली जाते. पण गेल्या चार दिवसांत वातावरणात आर्द्रता नव्हती. उन्हाचे चटके बसत होते. शिवाय, असह्य अशा झळा येत होत्या. हे वातावरण मुंबईत नेहमीच आढळून येत नाही. साधारणपणे विदर्भ-मराठवाड्यात अशा प्रकारचं हवामान असतं.
 
मुंबईतलं किमान तापमान सरासरीच होतं. पण कमाल तापमान नेहमीपेक्षा 6 डिग्री सेल्सियसने जास्त नोंदवलं गेलं. असं घडण्याचं काय कारण असेल?
 
स्कायमेट या हवामान संस्थेने याचं उत्तर दिलं आहे. स्कायमेटच्या मते, ईशान्येकडून आलेल्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबई परिसरात ही परिस्थिती पाहायला मिळाली.
 
सध्या पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागात एका चक्रीवादळाचा प्रकोप सुरु आहे. याठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वारे त्या दिशेने वाहत आहेत. साधारणपणे, वारे हे समुद्रातून जमिनीकडे येत असतात. पण या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे उलट्या दिशेने वाहून पाकिस्तानच्या दिशेने जात आहेत. या वाऱ्यांना नॉर्थ-इस्टरली वारे असं संबोधलं जातं.
 
या वाऱ्यामुळेच भारताच्या पश्चिम किनारी भागात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं स्कायमेट संस्थेने सांगितलं.
 
ही स्थिती किती दिवस राहील?
स्कायमेट संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवस ही परिस्थिती कायम असेल. 30 मार्च नंतर पाकिस्तानकडील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर नॉर्थ-ईस्टरली वारे पुन्हा नॉर्थ-वेस्टरली मध्ये रुपांतरीत होतील.
 
म्हणजेच पुन्हा ते समुद्राकडून जमिनीकडे वाहू लागतील. या समुद्री वाऱ्यांमुळे मुंबई परिसरातील वातावरणात पुन्हा आर्द्रता निर्माण होऊन येथील पारा खालावेल.
 
त्यामुळे येत्या मंगळवारनंतर (30 मार्च) मुंबईकरांना तापमानवाढीतून दिलासा मिळेल, असं स्कायमेटने सांगितलं आहे.
 
पण मुंबईकरांची कडक ऊनापासून सुटका होणार असली तरी त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील तापमान वाढू लागेल. 31 मार्च नंतर मराठवाडा-विदर्भासह पठारी भागात उन्हाच्या झळा वाढू लागतील, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
 
ही स्थिती नवी नाही
मुंबईत अशा प्रकारची परिस्थिती नवी नाही. साधारणपणे मार्च महिन्यात मुंबई आणि परिसरात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
 
मार्च महिन्यात तापमान वाढ नेहमीच होते. 28 मार्च 1956 रोजी तर मुंबईत 41.7 डिग्री तापमान नोंदवण्यात आलं होतं. ही मार्च महिन्यातलं सर्वाधिक तापमान आहे, असं होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितलं.
 
यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षातील मार्च महिन्यातील कमाल आणि किमान तापमानासंदर्भातील तक्ताही दिला. यावरुन मुंबईतील मार्च महिन्यातील सरासरी तापमान 38 ते 40 डिग्रींच्या आसपास असतं, हे आपल्याला दिसून येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती