धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबात विधानभवनात बैठकीत जयंत पाटील बोलत होते.यावेळी जयंत पाटील यांनी प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या बदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास आपण बांधिल असतो आणि तो त्यांचा हक्कही आहे.
त्यामुळे निरा देवघर प्रकल्पातील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना त्या मिळतील यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाली असेल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही दिले.
त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा शासनाच्या निर्देशाची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तातडीने कार्यवाही करून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, असेही जयंत पाटील म्हणाले.
१९९९ पासून देवघर निरा प्रकल्पातील ३०० हून अधिक प्रकल्पग्रस्तांना अद्याप आमच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या नाही. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावून त्यावर तोडगा काढून आम्हाला हक्काच्या जमिनी मिळवून देण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकरी आनंदा डेरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्था निरा देवघरचे सचिव प्रकाश साळेकर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दिघे, संघटक संजय माने व लक्ष्मण पावगी यांनी राज्यसरकारचे आभार मानले आहेत.