शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर: आरोग्य मंत्री

बुधवार, 31 मार्च 2021 (10:33 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पवार यांना मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा काढला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
शरद पवार यांना गॉल ब्लँडरचा त्रास होत असल्याचे कळल्यावर बुधवारी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचं ठरवण्यात आलं असताना अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात त्यांच्या पित्ताशयातील खडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
 
मुंबईच्या ब्रीच कँडीमधील डॉक्टरांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली की काही चाचण्या केल्यानंतर रात्रीच शस्त्रक्रिया करण्याचं ठरवण्यात आलं. काही कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला गेला.
 
देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार केरळ आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार होते मात्र आता दौरे रद्द करण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती