राज ठाकरे हेच महाराष्ट्राचे फायरब्रँड

सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (10:45 IST)
महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे हेच फायरब्रँड असल्याचे मनसे सिनेमा विंगचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे.
 
अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना शिवसेना खासदार राऊत यांनी ’रोखठोक'मधून महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्य दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असे भाष्य केले होते. तसेच यात राज ठाकरेंचाही उल्लेख होता. यावरून खोपकरांनी उत्तर दिले आहे.
 
खोपकर म्हणाले की, सगळीकडून कोंडीत सापडला आहात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचे कसे होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरे, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झाला आहे तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच.
 
राऊत यांनी, ‘ठाकरे' हा महाराष्ट्राच स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ’ब्रँड' पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे म्हटले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती