पोलीस दलात कार्यरत असताना ऑनलाइन गेमिंगचं वेड पोलीस कर्मचार्याला चांगलंच महागात पडला आहे. ड्रीम 11 आणि क्रिकबज सारख्या ऑनलाइन गेमिंगमुळे पोलीस कर्मचारी तब्बल 62 लाखांच्या कर्जात बुडाला. हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने वर्दीच्या मागे लुटमारीचा मार्ग निवडला. त्याने लुटमारी करत असतानाच त्याने दोन तरुणांवर गोळाबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला.
सूरज देवराम ढोकरे (वय 37) असे अटक हवालदाराचे नाव आहे. तर अजीम अस्लम सय्यद (30) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र फिरोज रफिक शेख (27) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील अंबाडी - वाशिंद रोडवरील पाईपलाईनजवळ मैदे गावच्या हद्दीत दुचाकीवरून विरार पूर्व मधील चंदनसार येथे राहणारे फिरोज आणि मृत अजीम हे त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते. त्याच सुमाराला लुटमारीच्या उद्देशाने अंबाडी गावाच्या हद्दीत आरोपी हवालदार हा येणार्या जाणार्या नागरिकांवर पाळत ठेवून होता.
दुचाकीवरून फिरोज आणि मृत अजीम हे जात होते त्यावेळी यांच्या अंगावर दागिने पाहून त्यांचा आरोपी हवलदाराने पाठलाग करत दोघांना निर्जन रस्त्यात अडवले. त्यानंतर त्यांना धमकी देऊन अंगावरील दागिने हिसकावून घेत असतानाच मृत अजीमने झटापटी केली. त्यामुळे आरोपी हवलदाराकडे असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने दोघांवर गोळीबार करत सहा राऊंड फायर केले. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाल्याचे पाहून त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीमध्ये बिघाड झाल्याने त्याने दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला.