डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुढील शिक्षण घेऊ देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्यांना ही परवानगी नाकारली आहे. ‘जर आरोपी डॉक्टर पुन्हा महाविद्यालयात गेल्या, तर कनिष्ठ डॉक्टरांमध्ये चुकीचा संदेश जाईल, साक्षीदारांवर दबाव येऊ शकेल. त्यामुळे या तिघी डॉक्टर त्यांच्यावरचा खटला संपल्यानंतर शिक्षण पूर्ण करू शकतात’, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.
मागील वर्षी २२ मे २०१९ रोजी डॉ. पायल तडवी हिने नायर रुग्णालयातील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याआधी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून या तिघींनी जामीन देण्यात आला आहे.