पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही कोरोना लशीची निर्मिती होणार आहे. मुंबईतील हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन कोरोना लशीचं उत्पादन घेणार आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लशीचं उत्पादन घेतलं जाणार आहे. यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
सध्या या लशीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. यापैकी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत असून हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस ठोक प्रमाणात लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकिनमार्फत ही लस उपलब्ध केली जाईल. तर स्वतंत्रपणे कोरोना लशीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.