नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडको भवनला घेराव

गुरूवार, 24 जून 2021 (14:03 IST)
नवी मुंबईत येथे बांधण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी-कोळी समाजाकडून सिडको भवनला घेराव आंदोलन सुरू झाले आले.
 
आज (24 जून) नवी मुंबई परिसरातील सिडको भवन येथे हे आंदोलन होत आहे. कल्याण- डोंबिवली पालघर, वसई, ठाणे अशा विविध परिसरातूनही अनेक जण या घेराव आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
 
10 जून रोजीही यासाठी साखळी आंदोलन करून घोषणाबाजीने नवी मुंबई दणाणून सोडली होती. नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. उर्फ दिनकर बाळू पाटील यांचं नाव देण्याची आग्रही मागणी या माध्यमातून करण्यात आली.
 
गेल्या जवळपास दहा वर्षांपासूनच्या या मागणीने आता आक्रमक रूप घेतलंय आणि जोरही धरलंय. येत्या 24 जूनला सिडको भवनाला घेरावही घातला जाणार आहे.
 
एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र, 'मुंबईत जसा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंमुळे टिकला, तसा नवी मुंबईत दि. बा. पाटलांमुळे भूमिपूत्र टिकला' असं म्हणत भाजपचे नवी मुंबईतले नेते आणि आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाले आहेत.
 
ज्या पक्षात दि. बा. पाटलांची हयात गेली, त्या शेकापच्या भूमिकेबाबत मात्र संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. 10 जूनच्या मानवी साखळीत शेकाप दिसला नाही. दि. बा. पाटलांच्या नावाला विरोध नाही, अशी सावध भूमिका शेकापची आहे.
 
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्याच याच विषयावर एक पत्रकार परिषद घेतली होती.
 
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहू देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती.
 
मात्र, सर्वसामान्य नवी मुंबईकर दि. बा. पाटलांच्या नावासाठी रस्त्यावर उतरू लागल्यानं आंदोलनाला व्यापक रूप येताना दिसत आहे.
 
दि. बा. पाटील कोण आहेत?
ज्या दि. बा. पाटील यांचं नाव नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे म्हणून मागणी होते आहे ते पनवेल-रायगड भागातील 'शेतकरी कामगार पक्षा'चे मोठे नेते होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेतेही ते राहिले आहेत.
 
रायगड-ठाणे या भागामध्ये त्यांना मानणारा मोठा स्थानिक वर्ग आजही आहे. 2013 मध्ये त्यांचे देहावसान झालं. पाटील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही अग्रेसर होते. 'शेतकरी कामगार पक्षा'त त्यांनी काम करणं सुरू केलं आणि लवकरच रायगड परिसरातले मोठे नेते बनले.
 
लोकल बोर्डापासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास नंतर पनवेल नगरपरिषद, त्यानंतर विधिमंडळात पनवेल-उरण मतदारसंघाचे चार वेळा आमदार आणि नंतर रायगडचे दोनदा खासदार असा विस्तारित आहे. आणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. विधिमंडळातली त्यांची भाषणेही गाजली.
 
'शेकाप'चा उर्वरित महाराष्ट्रात उतार सुरू झाला, पण दि. बा. पाटील यांच्या रायगडमध्ये अजूनही या पक्षाची मुळं घट्ट आहेत. शेवटच्या टप्प्यात 1999 मध्ये ते शिवसेनेकडूनही एकदा लोकसभा निवडणूक लढले, पण त्यात त्यांचा पराभव झाला.
 
पण संसदीय कार्यासोबतच दि. बा. पाटील यांना त्यांच्या शेतकऱ्यांसाठी दिलेल्या लढ्यांसाठी ओळखलं जातं. जेव्हा 'सिडको'ची स्थापना झाली आणि नवी मुंबई शहरासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेणं सुरु झालं, तेव्हा त्या अपेक्षेपेक्षा कमी दरानं घेतल्या जात होत्या.
 
दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात 70च्या दशकात लढा उभारला गेला आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वाढीव मोबदला आणि काही प्रमाणात जमिनीही मिळाल्या. त्यानंतर न्हावा-शेवा बंदरासाठी घेतल्या गेलेल्या जमिनींसाठीही त्यांनी लढा उभारला. कष्टकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती