मुंबईत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत चौपटीहून अधिक वाढ

शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (12:54 IST)
कोरोनाचं संकट कमी होतं असताना आता मुंबईत साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. आता येथे डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरत चालली आहे. यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास चौपटीने वाढली आहे. यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. 
 
शहरात बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत असून शहरात ठिकठिकाणी डासांची पैदास वाढली आहे. यामुळे गेल्या महिनाभरात डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे 28 रुग्ण होते. तर ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 132 वर गेली आहे. जानेवारी ते ऑगस्ट डेंग्यूच्या एकूण रुग्णांची संख्या 209 झाली आहे तर गेल्या वर्षी हे प्रमाण 129 होते. 
 
येथे केवळ ऑगस्ट महिन्यात 790 मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद झाली आहे. 
 
डोंगरी, परळ, वांद्रेत सर्वाधिक रुग्ण
डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी (बी विभाग), परळ (एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत. कीटकनाशक विभागाने 13 लाख 15 हजार 373 घरांची पाहणी केली आहे. तसेच यातील 11 हजार 492 डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत.
 
नागरिकांना पालिकेचे आवाहन
दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी डेंग्यू, मलेरियाच्या साथीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माटुंगा, सायन येथील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन पाणी कुठल्याही प्रकारे साचून राहू नये, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. पालिकेकडून पाणी साचू देऊ नये असं आव्हान केलं जातं असून नागरिकांनी पाणी साचू देऊ नका, असं आवाहन महापौरांनी केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती