Mumbai News: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतील एका न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोनवरून मोदी आणि योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. न्यायालयाने म्हटले की, तो कोणत्याही सहानुभूतीला पात्र नाही.
मिळालेल्या माहितीनुसार न्यायिक दंडाधिकारी यांनी २९ मार्च रोजी २०२३ च्या खटल्याचा निकाल सुनावला. आरोपी कामरान खान मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद दंडाधिकारी जोशी यांनी फेटाळून लावला. आरोपीने मानसिक आरोग्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत, असे दंडाधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाने खानला दोषी ठरवले. दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेव्यतिरिक्त न्यायालयाने त्याला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने नोव्हेंबर २०२३ मध्ये मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून सरकारी जेजे रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली. तो पुढे म्हणाला, मोदींच्या जीवाला धोका आहे, दाऊद इब्राहिम मोदींना मारण्यासाठी ५ कोटी रुपये देऊ करत आहे. तसेच, मोदींच्या एका सहकाऱ्याने योगींना बॉम्बने उडवून देण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचे बोलले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मध्य मुंबईतील जेजे रुग्णालयात असताना नियंत्रण कक्षाला फोन केला आणि रुग्णांच्या लांब रांगेमुळे डॉक्टरांकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यास उशीर होत होता. न्यायालयाने म्हटले की, आरोपींमुळे पोलिस यंत्रणा अडचणीत आली हे स्पष्ट आहे. शिवाय, तक्रारीवरून हे देखील स्पष्ट होते की आरोपीने असे गुन्हे वारंवार केले आहे. अशा अफवांमुळे सरकारी यंत्रणेवरील दबाव आणि धोक्यात असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचा विचार करता, आरोपींबद्दल सहानुभूती दाखवणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.