मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरून वाईट स्तरावर

गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (09:01 IST)
मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरून वाईट स्तरावर पोहोचला. कमी झालेले किमान तापमान, कोरडे वारे आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर पोहोचल्याचे दिसून येत आहे.
 
‘सफर’ (सिस्टीम ऑफ एअर क्वॉलिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च) आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळां’च्या नोंदीनुसार बोरिवली (पूर्व), चकाला-अंधेरी, कुर्ला, मालाड (प.), पवई, विलेपार्ले (प.) या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर (प्रदूषक घटकांचे प्रमाण २०० ते ३००) राहिला. वांद्रे कुर्ला संकुलात तो अति वाईट स्तरावर पोहोचला. त्या ठिकाणी पीएम २.५ या प्रदूषक घटकाचे प्रमाण ३५० इतके नोंदविण्यात आले. विशेषत: सायंकाळी उपनगरातील अनेक भागात धुरकट वातावरणाचा अनुभव आला.
 
थंडीच्या काळात कोरडे वारे आणि धुरक्याचा प्रभाव मुंबई आणि परिसरात अनेकदा जाणवतो. त्यातच वाऱ्यांची गती कमी झाली की परिणामी जमिनीलगतचे प्रदूषक घटक हवेत विरून जात नसल्याने हवेचे प्रदूषण वाढते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती