मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव भरला!

गुरूवार, 22 जुलै 2021 (15:17 IST)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पैकी एक असलेला मोडक सागर तलाव भरला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ५३.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे महत्त्वाच्या पाच तलावांपैकी ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलाव गुरुवारी रात्री ३.२४ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला.
 
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव उशिरा का होईना, पण आता भरू लागले आहे.मुंबईकरांचे पाणीटंचाईचे टेन्शन दूर होणार आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले होते.पण गेल्या चार पाच दिवसापासून ठाणे व नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील तानसा तलावही गुरुवारी पहाटे ५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला.या दोन्ही तलावातून मुंबई शहराला दररोज सुमारे ९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.
 
अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावातील पाणीसाठा ५३.८६ टक्के म्हणजे ७ लाख ७९ हजार ५७८ दशलक्ष लिटर्सवर पोहचला आहे.दरम्यान कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली.यामुळे रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झाले. अंबरनाथ ते लोणावळा आणि टिटवाळा ते इगतपुरी दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी नाशिक आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्‍यान, मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असून, पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.
 
कसारा घाटात दरड कोसळल्‍याने रेल्‍वे रुळाचं प्रचंड नुकसान झालं आहे. टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. मात्र, टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंतची रेल्वे वाहतूक सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती