अल्पवयीन मुलांचं बेपत्ता प्रकरण! ३२५ जणांचा लागला शोध

सोमवार, 11 डिसेंबर 2023 (08:03 IST)
नवी मुंबई क्षेत्रात मागील 11 महिन्यांत एकूण 371 मुलं बेपत्ता झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यातील 325 प्रकरण सोडवण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आलं आहे. याप्रकरणी सापडलेले सहा जण घरातून रागावून किंवा बाहेर फिरण्यासाठी म्हणून गेले होते, अशी माहिती कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर समोर आली आहे.
 
दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्याशी संवाद साधावा, असं आवाहन नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केलं आहे.
 
शहरातून अल्पवयीन मुले, मुली बेपत्ता होत असून, अशा घटनांनी पालक चिंतित आहेत, तर बेपत्ता होणारी मुले अल्पवयीन असल्याने याप्रकरणी संबंधितांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. अशाच प्रकारातून चालू वर्षात ११ महिन्यांत नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातून ३७१ मुले बेपत्ता झाली असता ३२५ जणांचा शोध लागला असून, ४६ जणांची कसलीही माहिती समोर आलेली नाही.  त्यामध्ये ३२५ बालकांचा शोध लागला असल्याचे गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले, सर्वांच्या बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक, तसेच प्रेमसंबंधाचे कारण समोर आले आहे.
 
पालकांकडून मुलांना प्रेम मिळत नसल्याने ही मुले इतरांच्या आहारी जात असावीत. अल्पवयीन मुले बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक कारणांसह प्रेमप्रकरण अशी कारणे समोर आली आहेत, तर बेपत्ता झालेली व मिळून आलेली सर्व मुले, मुली ही मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील आहेत. नोकरी, व्यवसायामुळे घराबाहेर असणाऱ्या या कुटुंबांतील मुला-मुलींना पालकांकडून प्रेमाचा आधार मिळत नाही. लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेल्याचेही अनेक घटनांमध्ये समोर आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती