मच्छी मार्केटमधील २७ मच्छी विक्रेत्यांचे स्थलांतरित

बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (08:28 IST)
मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दादर फुल मार्केटजवळील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नजीकच्या मच्छी मार्केटमधील मच्छी विक्रेत्यांच्या विरोधाला न जुमानता जेसीबीद्वारे धडक कारवाई करून मार्केट खाली केले. या मार्केटमधील २७ मच्छी विक्रेत्यांना मरोळ मच्छी मार्केट व १०विक्रेत्यांना ऐरोली जकात नाका येथील मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. 
 
पालिकेने नोटीस न देता सदर कारवाई केल्याचा आरोप या मार्केटमधील मच्छी विक्रेत्यांनी केला आहे. मात्र पालिकेच्या जी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी, नोटीस बजावल्यानंतरच कारवाई करण्यात आल्याचा दावा केला आहे.प्राप्त माहितीनुसार,दादर येथील या मच्छीमार्केटमध्ये हैदराबाद, विशाखापट्टणम येथील गोड्या पाण्यातील मच्छी आयात करून त्याची घाऊक विक्री करण्यात येत असे.तसेच, काही मच्छी विक्रेते मुंबईतील समुद्रातील मच्छीची विक्री करीत होते.
 
या मच्छी मार्केटमुळे परिसरात मच्छीचा वास येत असे. तसेच, मच्छी विक्रेते या ठिकाणी भुसा टाकून देत होते. त्यामुळे मार्केटच्या ठिकाणी अस्वच्छता वाटत असल्याची तक्रार काही नागरिकांकडून करण्यात येत होत्या. तसेच, शिवसेनेच्या नगरसेविका प्रिती पाटणकर यांनी स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेऊन पालिकेकडे या मार्केटवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केल्याचे समजते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती