Mega Block :रविवारी मुबंईत रेल्वेचा मेगाब्लॉक

शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (23:16 IST)
विभागातील मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी  उपनगरीय विभागांवर रविवारी 14 ऑगस्ट 2022 ला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत हे मेगा ब्लॉक असणार आहे. 
 
 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर,परळ आणि भायखळा स्थानकावर थांबा घेतील.
 
कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11 :10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटणारी पनवेल/बेलापूर/वाशी करीता जाणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ)सकाळी 10.00 ते संध्याकाळी6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. हा मेंटनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती