मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच नव्हे, तर दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांनी नागरिकांना 15 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार आजपासून या नव्या नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे. विनाहेल्मेट असल्यास दुचाकीस्वारांवर 500 रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स जप्तीची कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
मुंबईत अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट मोटारसायकल चालवतात, त्यासोबतच दुचाकीवर मागे बसणारी व्यक्ती हेल्मेट वापरत नाही. त्यामुळे अनेकदा अपघातात नाहक जीवितहानी होते. त्यामुळे नव्या मोटार वाहन कायद्यांतर्गत मुंबई वाहतूक शाखेकडून दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट खरेदीसाठी मुंबईकरांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्या विनाहेल्मेट नागरिकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आले आहे.