अनधिकृत बांधकामे रोखा ; तातडीने युद्ध पातळीवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश

गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (08:02 IST)
अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. कोविडमध्ये आपण खूप चांगली कामगिरी केली आहे. आता रस्ते, पदपथ, स्वच्छता, नागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रीत करून कालबद्ध रीतीने ती कामे पूर्ण करा आणि मुंबई शहराचा देशात आदर्श निर्माण करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आजच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते.
 
मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्यकठोरपणे यावर तातडीने कारवाई कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा, कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळाली नाही पाहिजे हे पहा असेही ते म्हणाले.
 
आपल्याला शहर सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले करायचे आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्त्यांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील हे पाहण्याचे काम व पूर्ण करा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
कोविड लढाईत मुंबई मॉडेलची प्रशंसा झाली. आपल्या प्रयत्नांमुळे ते शक्य झाले आहे, टीमवर्क म्हणून आपण स्वत:ला सिद्ध केले आहे, पण एवढ्याचवर न थांबता आता आपल्याला नागरी सुविधांवर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे.  ज्याप्रमाणे आपण दररोजच्या स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय पथके नेमलेली असतात त्याप्रमाणे डेब्रिजसाठी देखील पथके नेमावीत व बांधकामाचा कचरा, दगड-विटा माती लगेचच्या लगेच कसा उचलता येईल हे पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
सणांमागून सण येत आहेत, दिवाळी येतेय. एकीकडे कोविडचा धोका अजूनही संपलेला नाही. युकेमध्ये कोविड संसर्गात परत वेगाने वाढ दिसते आहे. तिथे परत रुग्णालये रुग्णांनी भरत आहेत, मी तेथील काही डॉक्टर्सशी सुद्धा बोललो असून आपल्याला देखील काळजी घ्यावी लागेल. पावसाळा संपत असताना मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या साथीच्या आजारांनी देखील डोके वर काढले असून आपण अतिशय काळजीपूर्वक हे रोग पसरण्यापासून रोखले पाहिजेत. त्यागवृष्टीने सर्व प्रकारची जनजागृती देखील करा आणि डासांचा नायनाट प्रभावीपणे होईल, अस्वच्छता राहणार नाही हे पाहण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती