IITतील विद्यार्थ्याला बनवले 'सेक्स स्लेव्ह', अनैसर्गिक अत्याचारात आरोपीला पत्नीचीही साथ

सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (17:40 IST)
Photo: Symbolic
आयआयटी मुंबईतील एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत त्याला 'लैंगिक गुलाम' बनविल्याची तक्रार पवई पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
 
33 वर्षीय पीएचडी विद्यार्थ्याने आपण समलैंगिक असून आपल्यावर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी लैंगिक अत्याचार झाल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
 
या प्रकरणी पवई पोलिसांनी 11 फेब्रुवारी रोजी हत्येचा प्रयत्न, अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांनी कलम 377, 370 सह कलम 3 (1) (2) 307, 504 भा.दं.वि.महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध व समुळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम 2013 सह कलम 27 अंमली पदार्थ विरोधी कायदा सह कलम 67 माहिती तंत्रज्ञानअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
समलैंगिक डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख
उच्चशिक्षित विवाहित शुभ्रो बॅनर्जी आणि त्याची पत्नी मनश्री मुखर्जी विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपी मुंबईतील भोईवाडा परिसरात राहणारे आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईवाडा येथील क्रिसेंट टॉवर येथे हे उच्चशिक्षित दाम्पत्य राहते.
 
सदर आरोपी शुभ्रो आणि पीडित विद्यार्थी यांची ओळख दोन वर्षांपूर्वी एका समलैंगिक अॅपच्या माध्यमातून झाली. परंतु आरोपीने पीडित विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच अनैसर्गिक लैंगिक छळ करू लागले.
 
मारहाण आणि लैंगिक छळ एवढ्यावर ते थांबले नाहीत तर अंधश्रद्धेचेही अनेक अघोरी प्रकार करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
'जप, तप, मंत्र आणि तांत्रिक सेक्स'
विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार गुवाहटीमधील एका देवीचा प्रसाद खायला देत जप, तप, मंत्र आणि टॅरोट कार्डचाही वापर करून त्याला संमोहित करण्यात येत होतं.
 
विद्यार्थ्याच्या हातात, गळ्यात, विविध दोरे बांधून अंगावर मेणबत्तीचे चटके देऊन पीडित विद्यार्थ्याशी सेक्स केला जात असे, असे तक्रारीत म्हटले आहे.
 
हातावर कापूर जाळून विद्यार्थ्याला सेक्स करण्यास भाग पाडले जात होते असंही तक्रारीत म्हटलं आहे.
 
विद्यार्थ्याला सेक्स स्लेव्ह म्हणजे 'लैंगिक गुलाम' करण्यात आल्याचंही म्हटलं आहे.
 
विद्यार्थ्याला बेशुद्ध करून अंगावर मेणबत्तीचे गरम थेंब टाकले जायचे. हा सर्व प्रकार आरोपीच्या घरी होत होता.
 
पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधान सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दोन दिवसांपूर्वी आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 
"पीडित विद्यार्थ्याने त्याच्या तक्रारीत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. त्यानुसार आम्ही अंधश्रद्धेचे कलमही लावले आहे. त्याने दिलेली माहिती आम्ही व्हेरिफाय करत आहोत. तपास सुरू आहे," पोलिसांनी सांगितले.
 
आरोपीला पत्नीची साथ?
पवई पोलिसांनी या प्रकरणी शुभ्रो बॅनर्जीच्या पत्नीविरोधातही समान गुन्ह्यांची नोंद केली आहे.
 
मनश्री बॅनर्जी विरोधातही गुन्हा दाखल असून तिने पोलिसांना न कळवण्याची धमकीही पीडित तरुणाला दिली होती. पोलिसांना कळवल्यावर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
 
विद्यार्थ्याने संबंधांना नकार दिल्यास त्याला मारहाण केली जायची.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती