नवी मुंबई मनसेचे शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्याच पत्नी संजीवनी काळेंकडून काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काळे यांच्यावर मानसिक, शारीरिक छळाचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.याच पार्श्वभूमीवर संजीवनी काळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहोचल्या होत्या.यावेळी राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि रिटा गुप्तांसोबत संजीवनी काळे यांची चर्चा झाली. मला कृष्णकुंजवर न्याय मिळणार,अशी संजीवनी काळे यांनी आशा व्यक्त केली आहे.
शर्मिला ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर संजीवनी काळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळेस संजीवनी काळे म्हणाल्या की,सध्या राज ठाकरे पुण्याला आहेत.मी शर्मिला ठाकरे यांना भेटली आहे. त्या मला योग्य तो न्याय देणार आहेत. माझं सगळं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आहे.मला कृष्णकुंजवर न्याय मिळणार आहे, हे मला माहित आहे. माझं पत्र शर्मिला वहिनींना दिलं असून माझी सर्व बाजू त्यांनी ऐकून घेतली आहे. त्यांनी मला न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे.
२००८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतर १५ दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सावळा रंग आणि माझी जात कारणावरून मला टोमणे मारू लागला,जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तो मला बोलला की, तू सावळी आहेस,तुझी जात वेगळी आहे.तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही असे बोलला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी गजानन याने मला मारहाण केली होती, असं संजीवनी काळे यांनी पोलिसांना एफआयआरमध्ये सांगितलं आहे.