Gateway Of India गेट वे ऑफ इंडियाच्या 100 वर्ष जुन्या वास्तूला तडे, पुरातत्व विभागाचा अहवाल

गुरूवार, 9 मार्च 2023 (12:28 IST)
वर्षानुवर्ष समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियासंबंधित चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. या 100 वर्ष जुन्या वास्तूला धोका निर्माण झाल्याची माहिती महाराष्ट्र पुरातत्व विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमधून समोर आली आहे.
 
राज्य पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेल्याचे समोर आल्यामुळे ती इमारत कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात राज्य पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारकारला गेट वे इंडियाच्या संवर्धनाचा प्रस्ताव मांडला आहे.
 
1911 साली मुंबईच्या समुद्र किनारी ही वास्तू बांधण्यात आली तर 1924 साली सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. ब्रिटनचे किंग पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी क्वीन मेरी यांच्या भारतभेटीच्या निमित्ताने समुद्रात भराव घालून गेट वे ऑफ इंडियाची कमान उभारण्यात आली.
 
पर्यटकांसाठीही आकर्षण असलेल्या या वास्तूला आता तडा गेल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पुरातत्व विभागाने 6.9 कोटींचा संवर्धनाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान हा प्रस्ताव अद्याप मंजुर झालेला नाही. 
 
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती