दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, आता तब्बल ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल अर्थात उन्नत मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. ५ हजार ५६० मीटर लांबीचा हा पूल प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात प्रगतीपथावर असून याबाबतची निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे.
निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ४२ महिन्यांचा कालावधी अंदाजित आहे, अशी माहिती महापालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे. उन्नत मार्ग हा दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणाऱ्या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे ५.५६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या ३० मिनिटे ते ५० मिनिटे एवढा कालावधी लागतो.
मात्र, भविष्यात हे अंतर कापण्यासाठी उन्नत-मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ ६ ते ७ मिनिटे लागतील. दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत व अधिक सुलभ करण्यासाठी अधिक वेगवान होण्यासही या प्रस्तावित उन्नत मार्गामुळे मोठे बळ मिळणार आहे.