मिळालेल्या माहितीनुसार फ्लाइटने २ एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून उड्डाण केले आणि ३ एप्रिल रोजी पहाटे मुंबईत उतरणार होते. पण, वैद्यकीय आणीबाणीमुळे विमानाचे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी दियारबाकीर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका प्रवाशाची तब्येत बिघडली, त्यामुळे त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी विमान तुर्कीकडे वळवावे लागले, अशी बातमी समोर आली आहे. तसेच, तिथे अडकलेल्या प्रवाशांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या भयानक प्रवासाची कहाणी शेअर केली आहे. प्रवाशांनी अन्न, शौचालय सुविधा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी चार्जिंग पॉइंट्स यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकरणात, आप नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी 'एक्स' वर हा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यांनी लिहिले, '२४ तास झाले आहे आणि एकाही एअरलाइन प्रतिनिधीने प्रवाशांना भेटलेले नाही. त्यांच्याकडे जेमतेम अन्न आहे, २७५ प्रवाशांसाठी एकच शौचालय आहे आणि त्यांच्या फोनची बॅटरी संपत आली आहे कारण त्यांच्याकडे टर्किएसाठी आवश्यक असलेले अडॅप्टर नाही. या समस्येने ग्रस्त असलेल्यांमध्ये मुले, गर्भवती महिला, मधुमेहाचे रुग्ण आणि वृद्ध लोकांचा समावेश आहे. असे देखील त्या म्हणाल्या.