मिळालेल्या माहितीनुसार दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयानंतर मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. मंगळवारी, सालियन, त्यांच्या वकिलासह, दक्षिण मुंबईतील सह पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या कार्यालयात पोहोचले. २०२० मध्ये त्यांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना (यूबीटी) आमदार आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी तक्रार पोलिस सहआयुक्तांकडे (जेसीपी) सादर केली. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी जून २०२० मध्ये झालेल्या त्यांच्या मुलीच्या मृत्यूच्या परिस्थितीची नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सतीश सालियन यांच्या वकिलांनी सांगितले की, आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार मुंबई पोलिसांना सादर करण्यात आली आहे.