लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढलं होतं. मात्र, पालिकेच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळाला नसल्याने निविदा दाखल करण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ग्लोबल टेंडरच्या निविदेसाठी २५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईमध्ये लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्याकारणाने अनेक लसीकरण केंद्र काही दिवस बंद होते. लसींच्या तुटवड्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने ग्लोबल टेंडर काढलं होतं. ग्लोबल टेंडरसाठी निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख १८ मे होती. परंतु निविदा न आल्याने निविदेसाठी मुदतवाढ करण्यात आली. ग्लोबल टेंडर पूर्ण झाल्यानंतर अजून चार लसींचा समावेश होणार आहे. यामध्ये फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, स्फूटनिक व्ही आणि मॉडर्ना अशा चार लसींचा समावेश आहे.