’तारे जमीन पर’ चित्रपटासारखाच उदयोन्मुख चित्रकार शिवम हुजूरबाजार यांच्या अमूर्त चित्रांचे प्रदर्शन

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (16:44 IST)
प्रत्येकाच्या अंगी एक कला असते, एक कौशल्य असतं. त्या कलेतूनच तो वाखाणला जातो. ‘तारे जमीन पर’चित्रपटासारखाच जळगांव येथील उदयोन्मुख चित्रकार शिवम हुजूरबाजार याने साकारलेल्या विलोभनीय अमूर्त चित्रांचे प्रदर्शन ‘बियॉन्ड इमेजीनेशन’हया शीर्षकांतर्गत मुंबईत काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत दि. 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, 2023 या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. याप्रसंगी डॉ. राज सिंग (कुलगुरू, जैन (डीम्ड-टू बी यूनिवर्सिटी) बेंगळुरू), डॉ. अविनाश डी. काटे (प्रमुख, आर्ट अँड डिझाइन – शांतामनी कला केंद्र, बेंगळुरू), ख्यातनाम चित्रकार राजेंद्र पाटील, योगेश सुतार, डॉ. जसवंत पाटील (एमडी, बीएचएमएस (होमियोपथी). सदस्य, आयुष टास्क फोर्स, मुंबई), डॉ. अजय चौगुले (हृदयशल्य विशारद, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई) यांच्यासहित कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.         
चित्रकार शिवम हुजुरबाजार याने या प्रदर्शनात अॅबस्ट्रक्ट व मॉडर्न आर्ट पेंटिंगची विविधता साकारली आहे. ज्येष्ठ समाजसेवक कै. डॉ. अविनाशजी आचार्य व अनुराधा आचार्य यांचा नातू व न्यूरोसर्जन डॉ. संजीव हुजूरबाजार व डॉ. आरती हुजुरबाजार यांचा शिवम हा मुलगा. घरातील वातावरण वैद्यकीय सेवेचे असले तरी शिवमचा कल लहानपणापासून चित्र काढण्याकडे होता. अगदी ‘तारे जमीन पर’ चित्रपटासारखाच. आपल्या मुलाची चित्रकलेची ओढ पाहून डॉ. संजीव हुजूरबाजार व डॉ. आरती हुजुरबाजार यांनी शिवमला वैद्यकीय क्षेत्रात न ओढता त्याच्या मनाप्रमाणे क्षेत्र निवडू दिले. शिवमने वयाच्या 12 व्या वर्षी रेखाचित्रांमध्ये रस घेतला. सुरूवातीला त्यानी पेंट सॉफ्टवेअरच्या सहाय्याने संगणकाच्या मदतीने अनेक रेखाचित्रे काढली. त्यांचे पहिले चित्र प्रदर्शन 2013 साली जळगांव येथे भरले होते. तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने चित्रकलेमध्ये जी. डी. आर्टची पदवी संपादन केली. आतापर्यंत त्याची जळगांव, पुणे, मुंबई (जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, सिमरोझा आर्ट गॅलरी) अशा नामवंत आर्ट गॅलरीत कला प्रदर्शने भरविली असून त्याच्या चित्र प्रदर्शनास
कलारसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. पेंटिंग व्यतिरिक्त शिवमला फोटोग्राफीची आवड असून त्याला निसर्ग आणि फूड फोटोग्राफीमध्ये खूप रस आहे. शिवम अवघ्या २७ वर्षाचा असून एक कलाकार म्हणून त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत हजारो चित्रे कॅनव्हासवर रेखाटली असून ती सर्व चित्रे त्याने विकसित केलेल्या www.shivamhuzurbazar.com हया वेबसाईटवर पाहायला मिळतील. शिवमने आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊन साकारलेली ही अमूर्त चित्रांची कलाकृती जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दि. 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, 2023 हया दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 हया वेळेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती