33 कोटी झाडे खरोखर लावली का?

गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (16:38 IST)
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील कोट्यवधी वृक्षांच्या लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचे स्वागत केले आहे. वृक्ष लागवड हे ईश्र्वरी काम आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
 
फडणवीस सरकारच्या काळात 33 कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा केला सरकारने केला होता. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर वर्षाकाठी साधारण 1 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, नेमकी किती वृक्षांची लागवड झाली याबद्दल अनेकांना संशय होता. वृक्षसंवर्धनाचे काम  करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सरकारच्या दाव्याबद्दल त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले होते.
 
राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता नव्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडी  सरकारमधील काही मत्र्यांनी वृक्षलागवडीच्या संख्येवर संशय व्यक्त करून तसे पत्रही विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांना लिहिले होते. त्यानुसार राठोड यांनी वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नेमके किती वृक्ष लावण्यात आले. ते नेमके कोणते होते आणि त्यातील किती जगले? या सार्‍याची चौकशी केली जाणार आहे.
 
मुनगंटीवार यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजप सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीच्या प्रयत्नांची लिम्का बुकनेही नोंद घेतली होती. सरकारचे एकूण 32 विभाग या अभियानात होते. त्या सर्वांची चौकशी नव्या सरकारने करावी. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी व्हावी आणि गरज वाटल्यास श्र्वेतपत्रिकाही काढावी, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती