मुंबई : मुंबईत या वर्षीच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत सकाळी पारा १३.८ अंशावर पोहोचला होता. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत १५ ते १७ जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून मागील आठवड्यात वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.
दरम्यान, मुंबईत रविवारी (दि. १५) दिवसाच्या कमाल तापमानामध्ये देखील घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान २५ डिसेंबर रोजी १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर आज १३.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईची हवा आज दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीमध्ये गेल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे हवा प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळाले. मुंबईतील तापमानामध्ये घट झाल्यानंतर शहरामधील हवा गुणवत्ता पातळी कमालीची खालवली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यापुन्हा एकदा डोके वर काढू शकतात. मुंबईतील किमान तापमानामध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी अशी नोंद बघायला मिळाली आहे. मुंबईतील किमानतापमान १३.८ अंशांवर गेल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट स्थिती गेल्याची बघायला मिळाली. दिल्लीपेक्षा देखील जास्त मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचे सफरच्या नोंदीनुसार पाहायला मिळाले.