पावसाचे पाणी ट्रॅकवर साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

बुधवार, 9 जून 2021 (17:22 IST)
मुंबई – मुंबईला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले असून सकाळपासूनही सर्वत्र धुवाँधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मध्य रेल्वेने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून 4 दिवस हे धोक्याचे असणार आहेत. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यातच मुंबईत मान्सून दाखल झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती