वांद्रे पश्चिम येथे एका 64 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 (21:35 IST)
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे एका 64 वर्षीय महिलेचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला आहे.
महिलेची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी सकाळी एका महिलेची बेपत्ता असण्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. महिलेची हत्या एका निवासी घरात झाली. हा गुन्हा तीन ते चार दिवसांपूर्वी घडल्याचा संशय पोलिसांना आहे.
या नंतर नियंत्रण कक्षाने वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला सदर माहिती दिली. पोलिस रिक्लेमेशन डेपोचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तिथे त्यांना महिलेचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला.
मारेकऱ्यांनी महिलेचे हात बांधून धारदार शस्त्राने मानेवर वार केले होते. वांद्रे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.