कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलून निर्बंध लागू केले आहेत. तरीही कल्याण पूर्वमध्ये एका लग्न समारंभात ७०० वऱ्हाडी मंडळींनी उपस्थित राहून पालिकेचे नियम पायदळी तुडवीत नियमांचे उल्लंघन केले आहे. पालिका प्रशासनाने या विवाह सोहळ्यावर कडक कारवाई करीत विवाह सोहळ्याच्या दोघा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
कल्याण पूर्वतील साठ फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी संपन्न होत असलेल्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती मिळताच ५/ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली असता, या विवाह समारंभात सुमारे ७०० वऱ्हाडी मंडळी उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांनी सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावणे अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे वर्तन करून कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.
या विवाह सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे, चिंचपाडा, कल्याण पूर्व आणि महेश कृष्णा राऊत, कासारवडवली, जि. ठाणे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.