शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करत केदार दिघे यांच्यावर जबाबदारी सोपवली. जिल्हाप्रमुख पद मिळाल्यानंतर केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडितेला धमाकवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
लोअर परळ येथील एका हॉटेलमध्ये दिघे यांच्या मित्राने बलात्कार केल्याचा आरोप पिडीत तरूणीने केला असून तक्रार न करण्यासाठी धमकाविल्याचा आरोप दिघे यांच्यावर आहे. एक तरुणी लोअर परळ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करते. हॉटेलची मेंबरशीप घेण्यासाठी केदार दिघे यांचा मित्र रोहित कपूर त्या हॉटेलमध्ये गेला आणि सदस्य फी चा चेक घेण्यासाठी हॉटेलच्या खोलीत गेल्यावर रोहितने बलात्कार केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार न करण्यासाठी दिघेंकडून धमक्या येत होत्या असे या तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.