बंद करा हे लाईव्ह कव्हरेज

बस्स. आता खूप झालं. गेल्या ४५ तासांपासून टिव्ही चॅनेल्ससाठी मुंबईची घटना म्हणजे एखादा 'रियालिटी शो' झाला आहे. हा भारतावर झालेला हल्ला आहे. याचं महत्त्व आणि गांभीर्य कदाचित त्यांना समजलेलं नसावं. सेना आणि पोलिस या वेळी काय करताहेत हे लाईव्ह दाखविण्याचा अर्थ काय? 'सबसे आगे' 'सबसे तेज' रहाण्याचा हा अट्टाहास आता त्रासदायक ठरू लागला आहे. मुंबईच नव्हे तर पूर्ण देश दहशतीखाली आहे आणि हे लाईव्ह प्रसारण ही दहशत कमी करण्याऐवजी वाढवत आहे.

सातत्याने टीका होऊनही इलेक्ट्रॉनिक मीडीयाने कोणताही धडा घेतलेला नाही. कारगिल, गुजरात भूकंप आणि आता मुंबई. या सर्वच घटनांत मीडीयाने बहुतांशवेळा बालबुद्धी दर्शवली. मुंबईतली घटना हे युद्ध आहे. ते सीमेवर नव्हे तर शहरात लढले जात आहे. हे छुपे युद्ध भारतीय सेनेपुढील आव्हान अधिक कठीण करते आहे. अशावेळी एखाद्या चित्रपटाप्रमाणे दाखविले जाणारे लाईव्ह कव्हरेज बंद करून केवळ महत्त्वाच्या तेवढ्याच बातम्या दाखविल्या पाहिजेत. सेनेनेही पूर्ण ताकद लावून कारवाई केली पाहिजे व मीडीयाला महत्त्वाची तेवढी बातमी दिली पाहिजे.

आत्ताच टिव्हीवर एक दृश्य पाहिले आणि संताप झाला. चाळीस तास ताजमध्ये ओलीस राहिल्यानंतर एक अमेरिकी महिला सेनेच्या मदतीने बाहेर आली. तिच्यासोबत दोन वर्षांचा एक मुलगाही होता. त्याला ताज हॉटेलच्याच एका कर्मचार्‍याने उचलून घेतले होते. ती महिला व ताजचा तो कर्मचारी आपल्याला त्रास देऊ नये अशी विनंती मीडीयाला करत होते. आपल्याला कोणताही प्रश्न विचारू नये असे त्यांचे म्हणणे होते. पण तरीही मीडीयावाले त्यांच्या मागे लागले होते. माईक आणि कॅमेरा घेऊन त्यांनी त्यांचा पाठलाग चालवला होता. आणि प्रश्न होता, 'अब आपको कैसे लग रहा है'. चाळीस तास अतिरेक्यांचा बंदी म्हणून राहिल्यानंतर कसे बसे बाहेर आल्यानंतर कसे वाटत असेल?

अन्य एका चॅनेलवर ताजमधून बाहेर पडलेल्या एका महिलेने मीडीयापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिचा मोबाईल नंबर मागितला गेला. म्हणजे फोनवर तरी तिच्याशी बोलता येईल. हा काय मुर्खपणा आहे? कव्हरेज करण्याच्या प्रयत्नात आपण भावनांचाही बळी दिला आहे काय?

अमेरिकेतील 9/11 च्या घटनेनंतरचे कव्हरेज यावेळी आठवते. तेथील मीडीयाने अतिशय संतुलितपणे बातम्या दिल्या होत्या. त्यावेळी सर्व चॅनेल्स एकच शीर्षक सातत्याने आळवत होते, 'वॉर ऑन अमेरिका'. त्यावेळी सरकारविरोधी किंवा राजकीय टिप्पणी टाळून रिपोर्टिंग करण्यात आले. आता मीडीयानेच नव्हे तर एक राष्ट्र म्हणून आपण परिपक्व होण्याची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा