आता कुठे गेले राज ठाकरे?

सोमवार, 3 मे 2010 (15:18 IST)
NDND
मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्राची राजधानी. मराठी लोकांचे शहर. हो फक्त मराठी लोकांचे शहर. अजून काय? हो, मुंबईची आणखी एक नवी ओळख राहिलीच. अतिरेक्यांचेही शहर.

मुंबईला आपण आधीच वाटून घेतले होते. चेन्नई तमिळींचे. बंगलोर कन्नडिगांचे. अहमदाबाद गुजरात्यांचे तसे मुंबई मराठी लोकांची. बिहारी, युपीच्या भय्यांची तर अजिबात नाही. तसा राज ठाकरेंनी परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकलण्याचा विडा उचललाच होता. त्याला तिकडे लालूप्रसाद यादव, अमरसिंह, पासवान यांनीही बोलभांड विरोध केला होता.

हा सगळा संघर्ष मुंबईच्या रस्त्याने काही दिवसांपूर्वीच पाहिला होता. त्यावेळी मुंबई कुणाची? हा प्रश्न चांगलाच गाजला होता. मुंबई मराठी माणसाची, देशवासीयांची, बिहारी, युपीतल्या भय्यांची असे वेगवेगळे सूर निघाले होते?

अतिरेक्यांना हा प्रश्न पडला नाही. त्यांना माहित होते, मुंबई भारताची आहे. तीच हादरवली की मुंबई अतिरेक्यांचीही होऊन जाईल याची खात्रीही होती. म्हणूनच त्यांनी आपसातील भांडणांचा चांगला उपयोग केला नि भारताच्या या नाकावर टिच्चून प्रहार केला. हा प्रहारही एवढा जबरदस्त होता की आपल्याच देशात आपल्याला सैन्याला हेलिकॉप्टरवरून उतरून अतिरेक्यांशी सामना करावा लागला. तीन दिवस या लोकांशी अहोरात्र लढावे लागले तेव्हा कुठे मुंबई ताब्यात आली.

आणि हो मुंबई पोलिसांच्याही परिस्थिती ताब्यात येत नव्हती. तेव्हा उत्तर भारतातल्या दिल्लीहून राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे (एनएसजी) 'परप्रांतीय' जवान मुंबई वाचविण्यासाठी धावून आले. राज ठाकरेंची मुंबई या उत्तर भारतीय जवानांनी मुंबई पोलिसांसह लढून 'देशाच्या' ताब्यात राखली. तेव्हा कुठे मुंबई पुन्हा आपल्याला मिळाली.

या सगळ्या हिंसक गदारोळात रस्त्यांवर सैरावैरा धावणार्‍यांत भय्ये, परपरप्रांतीय, उत्तर भारतीय मराठी असा कुठलाही भेद उरला नव्हता. सगळे भारतीय होते. आणि या 'भारतीयांवर' गोळ्या बरसवणारे तेवढे अतिरेकी होते.

हे सगळे होत असताना राज ठाकरे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होते. लालू, नितिशकुमार, अमरसिंह प्रभृतीही आपापल्या घरी शांततेत मुंबई जळताना पहात होते.

वेबदुनिया वर वाचा