स्फोटके आणि एके47 सारखी घातक हत्यारे घेऊन मुंबईत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्वाची ठिकाणे लक्ष्य बनविली. ताज आणि ओबेरॉयसारख्या फाईव्ह स्टार्स हॉटेलमध्ये हा शत्रसाठा घेऊन शिरणा-या दहशतवाद्यांनी कशाचीही भिडभाड न ठेवता रस्त्यावर उतरून बॉम्बस्फोट आणि गोळीबार करत दिसेल त्याला आपले लक्ष्य केले. रात्री 9.40 च्या सुमारास सुरू झालेल्या या हल्यानंतर रात्रभर चकमक सुरू होत्या. अचानक झालेल्या या हल्यामुळे पोलिस आणि सुरक्षायंत्रणांची एकच धांदल उडाली. 12 ठिकाणी गोळीबार आणि स्फोट घडवून आणले. असा झाला मुंबईतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला....
कुलाबा - दहशतवादी बोटीतून मुंबईत दाखल झाले. कायम गर्दी असणा-या कुलाबा बाजारपेठेत घुसलेल्या दहशतवाद्यांनी या ठिकाणी बॉम्बस्फोट आणि चौफेर गोळीबार करत दहशत माजवली. गोळीबारामध्ये काही नागरिक ठार झाले.
ओबेरॉय हॉटेल - दहशतवाद्यांनी मुंबईतील प्रसिध्द ठिकाणांना लक्ष्य केले. मुंबईतील फाईव्ह स्टार ओबेरॉय हॉटेलमध्ये घुसून त्यांनी गोळीबार सुरू केला. याठिकाणी ग्रॅनेड स्फोट झाल्याने हॉटेलमध्ये एकच खळबळ माजली. रात्रभर याठिकाणी स्फोट आणि गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांनी अमेरीकन व इंग्लंडच्या नारिकांना ओलीस ठेवले.
ताज हॉटेल - हॉटेल ताजमध्ये शिरताच दहशतवाद्यांनी चौफेर गोळीबार सुरू केला. सुरूवातीस तळघरात बॉम्बस्फोट झाल्यानंतर आग लागली. बघताबघता हॉटेलवर कब्जा करून त्यांनी हॉटेलमध्ये उतलेल्या नागरिकांवरही हल्ला केला. पोलिस व सुरक्षायंत्रणांनी नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू करत सुमारे 150 लोकांना बाहेर काढले. मात्र, दहशतवाद्यांनी शेकडो लोकांना बंदी बनविले. पोलिस आणि दहशतवादी यांची रात्रभर चकमक सुरू होती. यामध्ये अनेक पोलिस गंभीर जखमी झाले एके 42 या रायफलमधून बेछूट गोळीबार करणा-या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि एन्कांऊटर स्पेशालिस्ट विजय साळसकर शहीद झाले.
छ.शिवाजी टर्मिनस - दहशतवाद्यांनी कोणतीही भिडभाड न ठेवता अक्षरश: रस्त्यावर उतरून दहशत माजविण्याचा धाडसी प्रयत्न केला. छ. शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांची धावपळ उडाली. यामध्ये काही जण ठार झाले.
आझाद मैदान - आझाद मैदानात गोळीबार करून दहशतवादी जी टी हॉस्पिटलकडे पळाले.
कामा हॉस्पिटल - कामा हॉस्पिटलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी रूग्णांवरही गोळीबार केला.
मेट्रो सिनेमा - मुंबईतील प्रसिध्द मेट्रो सिनेमागृहानजिक दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. याठिकाणी पोलिस दाखल झाले पण, पोलिसांवरच गोळीबार करत दहशतवादी पोलिस व्हॅनमधून फरारी झाले.
डॉकयार्ड - कायम गर्दीचे केंद्र असणा-या डॉकयार्ड येथे टॅक्सीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. हा बॉम्बस्फॉट इतका मोठा होता की टॅक्सीच्या ठिक-या उडाल्या. मोठ्या आवाजामुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले.
मंत्रालय - दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांना केंद्र बनविले. मंत्रालयामोर रस्त्यावर उतरलेल्या दहशतवाद्यांनी चौफेर गोळीबार करून दहशत केली आणि ते फरार झाले.
जी.टी हॉस्पिटल - जी.टी हॉस्पिटलही लक्ष्य बनवित दहशतवादी हॉस्पिटलमध्ये शिरले आणि त्यांनी रूग्णांवरही गोळबार केला. याठिकाणी काही नागरिक आणि पोलिसांचा बळी गेला.
विले पार्ले- येथे प्लायओव्हरच्या खाली टॅक्सीमध्ये जोरदार स्फोट करण्यात आला.