तिचा हसतमुख चेहरा जीवन जगण्याची नवी उमेद देतं

प्रगती गरे दाभोळकर

शुक्रवार, 6 मार्च 2020 (12:15 IST)
एक विलक्षण व्यक्तिमत्त्व
##ऋचा कर्पे##

महिला दिवस हा संपूर्ण विश्वात फार उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. आजच्या दिवशी विविध स्तरांवर काम करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात येतं, त्यांची कामगिरी संपूर्ण जगासमोर येते. सृष्टी निर्माण करणाऱ्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे "स्त्री". आज 21व्या शतकात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव केलं आहे. कला, मनोरंजन, संगीत, विज्ञान, राजकारण, असं कोणतंच क्षेत्र नाही ज्यात स्त्रियांचं स्थान नाही. दहावी- बारावीची परीक्षा असो किंवा विधानसभेची निवडणूक, सगळीकडे महिला अग्रगण्य आहे.
 
स्त्रियांमध्ये जीवनाचं गांभीर्य जास्त असतं, तसंच परिपक्वता आणि जबाबदारीची जाणीव ही फार कमी वयातच त्यांना आलेली असते. समोर जी परिस्थिती असेल त्यात निभावून न्यायचं, तसेच संकट उपस्थित झाल्यावर सामोरी जायचं, हार मानायची नाही हा गुण उपजतंच त्यांच्यात असतो. असं अजिबात नाही की प्रत्येक वेळेला त्यांना कोणाचातरी आधार मिळाला पाहिजे. त्या स्वतःचा स्वतःला आधार देत पुढे जाऊ शकतात.
 
आज अशाच एका मुलीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
तर झालं असं की एका कार्यक्रमात सहभागी झालेले असताना मी पहिल्या रांगेत बसलेल्या एका मुलीला पाहिलं... त्या सोहळ्यात मी पुरस्कार ग्रहण करायला गेलेली असून पहिल्या रांगेत सर्व पुरस्कार प्राप्त करणारे बसले होते, पण सगळ्यात "यंग" मीच होते असं मला वाटत होतं. काही अंतरावर एक मुलगी बसली होती, ती व्हील चेयरवर होती, त्या अर्थी कोणाच्या सोबत आहे असं मला वाटत होतं. नंतर काही वेळाने कार्यक्रम सुरू झाला. एक-एक सगळ्यांना पुरस्कार मिळू लागले, तेव्हा त्या मुलीचं नाव घोषित करून तिला विशेष पुरस्कार देण्यात आला. मला फार कौतुक वाटलं. तिच्यासाठी प्रमुख पाहुणे स्वतः मंचावरून खाली उतरले, मी तिच्याकडे पाहत होते.. ती फार गोड हसत होती... सगळ्यांशी फार प्रेमाने बोलत होती.. मी तिच्या जवळ जाऊन तिला नाव विचारले. ती स्मितहास्य करत बोलली "ऋचा"... जवळ गेल्यावर मला समजलं की तिच्या शरीरातील निम्मा हिस्सा अपंग आहे. एका नजरेत काही तसं कळत नाही, पण निरखून पाहिलं तर ती दिव्यांग आहे हे समजतं नकळत डोळ्यात अश्रू आले, फार कौतुकही वाटलं. अशा अवस्थेत कशी जगत असेल ? 
माझी तिची भेट फक्त 5 मिनिटाची पण त्यानंतर संपूर्ण रात्र ट्रेनमध्ये झोप लागली नाही. घरी आल्यानंतर पुरस्काराच्या आनंदात गुंग झाले आणि काही वेळासाठी तिला विसरले पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तिचं हास्य लपून बसलं होतं. काही दिवस गेले मनात एकदा पुन्हा आलं की तिच्याबद्दल जाणून घेऊ, मनातली लेखनी वारंवार तिच्या विषयावर लिहायला सांगत होती पण वास्तविक पाहता ना ओळख ना नातं, अरे तिला माझं नाव सुद्धा माहीत नव्हतं... काय करू या विचारात अजून काही दिवस गेले. मग पक्का निश्चय केला आणि तिचा नंबर मिळवला, फोन लावला आणि घाबरत विचारलं की मला माहिती मिळेल का?? आधी तर ती फार गोड हसली आणि नंतर तिने माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फार उत्तम रित्या दिली. 
 
मी जो विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण आयुष्य आहे ऋचाचं... तिला जन्मतः "मायोपैथी" नावाचा फार असाध्य असा रोग आहे. या आजारात जन्मानंतर बाळाच्या मांसपेशी वाढत नाही आणि स्नायू तंत्र कमजोर असल्याने अशी मुलं अंथरुणावर पडून असतात. तिच्या बाबतीत डॉक्टरांनी असंच काही सांगितलं होतं. चार वर्षाची ऋचा जेव्हा चालू शकत नाही हे लक्षात आलं किंवा आधाराशिवाय तिला उभं राहणं किंवा चालणं शक्य नाही असं समजल्यावर आई-वडिलांनी उत्तम उपचार आणि अनेकानेक डॉक्टरांचे सल्ले घेतले परंतु सगळीकडे एकच उत्तर मिळालं की ही मुलगी काही करू शकणार नाही आणि अंथरुणावर पडून राहिल्याशिवाय काही पर्याय नाही. 
 
एवढं भयंकर सत्य कळल्यावर पण ते निराश- हताश झाले नाही. त्यांनी अनवरत काही न काही उपाय चालू ठेवले. वय वाढल्यावर ऋचाला कळू लागलं की ती इतर मुलांसारखी नाही. इतरांसारखं तिला वावरता येत नाही हे समजल्यावर सुद्धा तिने धीर सोडला नाही किंवा हार मानली नाही. तिने आपला आजार पूर्णपणे जाणून घेतला व त्यावर भारतात काय तर परदेशात सुद्धा कोणतं एक औषध असं नाही, हे लक्षात आल्यावर तिने लढायचं ठरवलं. स्वतःचा स्वतःशी निर्धार केला आणि परिस्थितीला सामोरा गेली. ज्यांनी तिच्या बाबतीत हे विधान केलं होतं की ही अंथरुणावर पडून राहणार त्या सर्वांना चूक सिद्ध करतं तिने आधी मिडिल स्कूल मग हायस्कूल आणि कॉलेज मग  स्नातकोत्तर पर्यंत अभ्यास केला. 
 
ती व्हील चेयरचा मदतीने सगळीकडे जायची. जे कोणी तिचा संपर्कात आले, तिच्या प्रेमळ आणि हसऱ्या स्वभावामुळे तिचेच झाले. अभ्यास करण्या व्यतिरिक्त ऋचा इतर कालांमध्येही पारंगत आहे. चित्रकला, पेंटिंग, शिवणकाम तसेच कढाई, मेंदी, रांगोळी ह्या सगळ्यात तिला महारात आहे. या व्यतिरिक्त लेखन आणि काव्य हे तिचे छंद आहे. तिच्या कविता अनेक मासिक आणि पत्रिकेतून प्रकाशित होत असतात.
"देवपुत्र, श्री सर्वोत्तम, लघुकथा कलश, किस्सा कोताह, मैफिल कुटुंबीय, कुसुमांजली अशा निरनिराळ्या पत्रिकांचा माध्यमातून ऋचा आपले लेख आणि कविता प्रकाशित करते. विविध कार्यक्रमातून तिचे काव्य पाठ होत असतात व यासाठी तिचं वेळोवेळी कौतुकही होत असतं. ऋचाला "देवी अहिल्या शक्ती सन्मान, मराठी साहित्य अकादमीचा केंद्र प्रमुख पुरस्कार, पुस्तक वाचन स्पर्धा राज्यस्तरीय पुरस्कार, अखिल भारतीय निबंध स्पर्धेत पाच वेळा प्रथम पुरस्कार, क्विज मास्टर देवास असे विविध पुरस्कार मिळाले आहे. इतकंच नव्हे तर मराठी या विषयाची तिला प्रचंड आवड आहे व ती सातत्याने मराठी परीक्षा, निबंध स्पर्धा, कविता या सगळ्यात सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावते. 
 
ब्रुहनमहाराष्ट्र मंडळाच्या सगळ्या परीक्षा व इतर स्पर्धा ती उत्तम मार्काने पास करत आली आहे. आपण कल्पना करू शकत नाही ज्या मुलीला हातात पेन धरून लिहिणं पण अवघड होतं तिने एकानंतर एक सगळ्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. यानंतर तिने आकाशवाणी इंदूरच्या मराठी विभागातून अनेकदा वार्ता प्रस्तुत केल्या आहे. मागच्या 5 वर्षांपासून "विद्यारण्य" आणि "कृतज्ञता" या दोन समाजसेवी संस्थेत ती "मीडिया मॅनेजर" व "वॉलेंटियर विंग ची प्रमुख" या नात्याने ऑनलाईन सेवा देऊन राहिली आहे. "टॅलेंट फर्स्ट कंसल्टेंट" बंगळुरू या ठिकाणी तिने एच आर या पदावर ऑनलाईन काम केलेलं आहे. 
 
मागचे अनेक वर्ष ऋचा लहान मुलांना शिकवते. तिच्या क्लासला 40 च्या वर विद्यार्थी आहेत. अशी सतत आपल्या त्रासांशी लढणारी ऋचा सदैव हसतमुख असते. रडून काही साध्य होणार नाही हे तिचं ठाम मत आहे. इतर मुलींप्रमाणे तिलाही फिरायला, शॉपिंग करायला आणि पाणी-पुरी खायला आवडते पण आपल्या त्रासाला पाहता ती वारंवार हे सगळं करू शकत नाही. साधं दैनंदिन कार्य आटपायला तिला कमीतकमी 3 तास लागतात. अंघोळ हे तिच्यासाठी फार मोठं आणि वेदनादायक उपक्रम आहे. पण तिच्या कुटुंबातील सदस्यांनी कधीही तिला उपेक्षित भावाने पाहिलं नाही. सतत जिव्हाळ्याने तिची जपणूक केली व तिला एक अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जेनं भरलेलं वातावरण दिलं आणि म्हणूनच आज ऋचा अनवरत व्यस्त आहे व कोणत्याही परिस्थितीत पाऊल मागे घेत नाही.
ऋचा म्हणते की तिला देवाने फार उत्तम वातावरण आणि माणसे दिली आहेत. जग फार सुंदर आहे आणि माणुसकी व जिव्हाळा असलेल्या लोकांनी भरलेलं आहे. ती स्वतःला कधीही आजारी मानत नाही कारण तिला कोणीही कधी कमी लेखलं नाही. 
 
ऋचाचं आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिचा खेळकर स्वभाव, हसतमुख चेहरा, आणि प्रेरणादायक जीवन हे सगळं अत्यंत विलक्षण आहे. एक असाध्य अशा आजाराने ग्रासलेली असून ती इतरांना जीवन जगण्याची नवी उमेद आणि ताकद देते. 
 
या महिला दिवस निमित्त ऋचाला ##मानाचा मुजरा##

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती