नागपंचमीला बनवा पारंपरिक पदार्थ हळदीच्या पानातील पातोळ्या

शुक्रवार, 25 जुलै 2025 (08:00 IST)
नागपंचमीला हळदीच्या पानांमध्ये बनवलेल्या पातोळ्या (Patolya) नैवेद्यासाठी एक पारंपरिक आणि खास पदार्थ आहे. तसेच हळदीच्या पानातील पातोळ्या हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो विशेषतः श्रावण महिन्यात बनवला जातो. हा पदार्थ हळदीच्या पानांच्या सुगंधी आणि औषधी गुणधर्मांमुळे खास आहे. तर चला जाणून घेऊ या रेसिपी.
ALSO READ: नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी पथोली, लिहून घ्या रेसिपी
साहित्य-
सारण तयार करण्यासाठी-
दोन वाट्या-किसलेलं ओलं खोबरं
दोन वाट्या- किसलेला गूळ 
एक टीस्पून- वेलची पूड
अर्धा टीस्पून- जायफळ पूड 
तीन टेबलस्पून- तूप
बाहेरील आवरण तयार करण्यासाठी 
१.५ वाटी- तांदळाचं पीठ
चिमूटभर मीठ
एक टेबलस्पून- तूप
पाणी 
आठ हळदीची पाने 
 
कृती- 
सर्वात आधी सारण तयार करण्यासाठी एका कढईत २-३ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात किसलेलं ओलं खोबरं घालून मंद आचेवर परतवून घ्या. आता खोबरे हलके परतले की त्यात किसलेला गूळ घाला आणि सतत परतवत राहा, यामुळे गूळ पूर्णपणे वितळेल आणि मिश्रण एकजीव होईल. आता या मिश्रणाला रंग येईपर्यंत परतवावे. त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
ALSO READ: नैवेद्यासाठी घरीच बनवा दूध पाक, जाणून घ्या रेसिपी
आता उकड तयार करण्यासाठी एका पातेल्यात १.५ ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यात एक टेबलस्पून तूप आणि चिमूटभर मीठ घाला. गॅस मंद करून हळूहळू तांदळाचं पीठ घालत ढवळत राहा. पाणी आणि पीठ एकजीव होईपर्यंत ढवळा.मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि पातेले झाकण लावूनपाच मिनिटे झाकून ठेवा.तयार उकड एका परातीत काढून मळून घ्या. उकड मऊ आणि लुसलुशीत होईल याची काळजी घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी शिंपडा.

आता पातोळ्या बनवण्यासाठी हळदीची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्या. उकडीचे छोटे गोळे बनवा. एका गोळ्याला हाताने किंवा लाटण्याने पातळ थापून गोल पुरीसारखा आकार द्या. आता हळदीच्या पानावर ही थापलेली उकड ठेवा. त्यावर अर्धा चमचे सारण पसरवा.पान मध्यभागी दुमडून कडा हलक्या हाताने दाबून बंद करा, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. आता मोदक पात्रात किंवा कुकरमध्ये पाणी गरम करा. त्यावर जाळी ठेवा. जाळीवर हळदीच्या पानातील पातोळ्या ठेवा आणि झाकण लावून पंधरा मिनिटे वाफवून घ्या.पातोळ्या शिजल्या की हळदीच्या पानांचा सुगंध येईल आणि उकड पारदर्शक दिसेल. आता गरमागरम पातोळ्यांवर साजूक तूप घालून पातोळ्यांचा नैवेद्य दाखवा. तसेच पातोळ्या थंड झाल्यावर पानातून काढा किंवा पानासहित सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: नैवेद्य कसा दाखवावा?
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Nag Panchami 2025 नाग पंचमी कधी? हे ३ उपाय दोष मुक्त करतील

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती